भारताला राष्ट्रकुल युवा स्पर्धेत दोन कांस्य
By Admin | Published: September 10, 2015 01:21 AM2015-09-10T01:21:05+5:302015-09-10T01:21:05+5:30
भारताने पाचव्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत बुधवारी येथे ट्रॅक अँड फिल्ड स्पर्धेत दोन कांस्यपदके जिंकली. त्याचप्रमाणे बॉक्सिंगमध्ये गौरव सोलंकीने अंतिम फेरीत धडक मारली.
एपिया : भारताने पाचव्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत बुधवारी येथे ट्रॅक अँड फिल्ड स्पर्धेत दोन कांस्यपदके जिंकली. त्याचप्रमाणे बॉक्सिंगमध्ये गौरव सोलंकीने अंतिम फेरीत धडक मारली.
अॅथलेटिक्समध्ये तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी अबिथा मेरी मॅनुअल हिने मुलींच्या ८०० मीटर शर्यतीत आणि अनामिका दास हिने मुलींच्या गोळाफेकीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. या दोन कांस्यपदकांमुळे भारताच्या नावावर आता १० पदके जमा झाली आहेत. त्यात ४ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत आता पदकतालिकेत सातव्या स्थानी घसरला आहे. भारताने अॅथलेटिक्समध्ये दोन सुवर्ण, एक रौप्य व तीन कांस्य पदके जिंकली.
पी. टी. उषाची शिष्या मॅनुअलने ८०० मीटर शर्यतीत २ मिनिटे ७.३३ सेकंदांची वेळ नोंदवताना आपली सर्वोत्तम कामगिरी करताना कांस्यपदक जिंकले. आॅस्ट्रेलियाच्या एमी हार्डिंग डेलूजने २ मिनिटे ०६.८४ सेकंदांसह सुवर्ण आणि स्कॉटलंडच्या कॅरी मॅकआली हिने २ मि. ०७.०५ सेकंदांसह रौप्यपदक जिंकले. (वृत्तसंस्था)
भारताला दुसरे कांस्यपदक अनामिका हिने गोळाफेकीमध्ये मिळवून दिले. उत्तर प्रदेशाच्या या खेळाडूने तीन किलोग्रॅमचा लोखंडी गोळा १५.०३ मीटर दूर फेकताना तिसरा क्रमांक मिळविला. आॅस्ट्रेलियाची ग्रेस रॉबिन्सन (१६.३९ मीटर) हिने सुवर्ण आणि इंग्लंडच सोफी मेरिट (१५.७८ मीटर) हिने रौप्य पदक जिंकले.