...तर भारत ‘चॅम्पियन’ बनू शकतो
By admin | Published: January 15, 2015 04:27 AM2015-01-15T04:27:03+5:302015-01-15T04:27:03+5:30
फलंदाजीच्या शानदार क्रमवारीच्या बळावर गतविजेता टीम इंडिया पुन्हा एकदा विश्वचषकात चॅम्पियन बनू शकतो,
नवी दिल्ली : फलंदाजीच्या शानदार क्रमवारीच्या बळावर गतविजेता टीम इंडिया पुन्हा एकदा विश्वचषकात चॅम्पियन बनू शकतो, असे मत माजी कोच जॉन राईट यांनी व्यक्त केले.
६० वर्षांचे जॉन राईट म्हणाले, ‘सध्याच्या संघाचा फलंदाजी क्रम २०११ च्या विश्वविजेत्या संघासारखाच आहे. अनुभवी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांची पुरेपूर साथ लाभल्यास भारत निश्चितपणे जेतेपदाचा हकदार राहील. गतवेळेच्या तुलनेत सध्याच्या संघात युवा जोश आहे. काही नवे चेहरे आहेत. विश्वचषकात निकाल हे लवकर गडी बाद करण्यावर आणि झेल घेण्यावर अवलंबून असतात.’
सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षकपद सांभाळणारे राईट पुढे म्हणाले, ‘आॅस्ट्रेलियात कसोटी मालिका आणि नंतर तिरंगी मालिका खेळणाऱ्या भारतीय संघाला विश्वचषक खेळण्यासाठी भरपूर संधी मिळणार आहे. पण आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या या विश्वचषकात जेतेपद मिळविण्यासाठी गोलंदाजी
तसेच फिल्डिंगमध्ये सुधारणेस वाव असेल.’
१४ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या क्रिकेटच्या महाकुंभात विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे खेळाडू महत्त्वपूर्ण भूमिका वठवतील, असे भाकीत करीत राईट म्हणाले, ‘आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत विराटने नेतृत्वगुणांची चमक दाखविली आहे. कर्णधारपद हे कोचिंगसारखेच असून यात उत्कृष्ट कामगिरी करण्यासोबतच उत्तम नेतृत्व देखील करावे लागते. विराटने दोन्ही आघाड्यांवर यशस्वी काम केले. रोहित हा क्षमतावान आणि मॅचविनर आहे. वीरेंद्र सेहवाग आणि युवराज यांना संधी न मिळाल्याबद्दल राईट यांनी निवडकर्त्यांसाठी हा कठीण निर्णय असल्याचे सांगून भविष्यात भारतीय संघाचे कोच बनणार असल्याची शक्यता फेटाळून लावली.
(वृत्तसंस्था)