India at Commonwealth Games 2018: सर्वोत्तम कामगिरीसाठी सिंधू सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 06:08 PM2018-04-02T18:08:38+5:302018-04-02T18:08:38+5:30
आतापर्यंत सिंधूने ग्लासगो येथे झालेल्या एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. यावेळी तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पण आता गोल्डकोस्ट येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सिंधूला ध्वजवाहक होण्याचा मान मिळाला आहे.
सध्याच्या घडीला भारतीय बॅडमिंटनमध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहे ती पी.व्ही.सिंधू. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावल्यावर सिंधूला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी करत तिने सायना नेहवाललाही मागे टाकले आहे.
आतापर्यंत सिंधूने ग्लासगो येथे झालेल्या एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. यावेळी तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पण आता गोल्डकोस्ट येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सिंधूला ध्वजवाहक होण्याचा मान मिळाला आहे.
पुलेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधू सराव करत आहे. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत सिंधूला स्पेनच्या कारोलिन मरिनकडून पराभव पत्करावा लागला होता. या अंतिम सामन्यात सिंधूने मरिनला अनपेक्षित लढत दिली होती. पण सिंधूला सुवर्णपदकाला गवसणी घालता आली नव्हती. पण सिंधूची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. यानंतर गेल्या दोन वर्षांमध्ये सिंधूने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे या राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात आहे.
इंडियन खुल्या स्पर्धेत सिंधूने ऑलिम्पिकच्या पराभवाचा बदला घेतला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने मरिनला पराभूत केले. त्यानंतर काही दिवसांतच सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यानंतर कोरिया खुली स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली होती.
सुवर्णपदकाचा मार्गात दुखापतीचा ससेमिरा
सराव करत असताना काही दिवसांपूर्वी सिंधूच्या घोट्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे सिंधू राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार की नाही, याबाबत संदिग्धता निर्माण झाली होती. पण सिंधू या दुखापतीतून सावरली असल्याचे म्हटले जात असले, तर तिच्या सुवर्णपदकाच्या मार्गात दुखापतीचा ससेमिरा असेल, असे म्हटले जात आहे.