India at Commonwealth Games 2018: सुवर्ण हॅट्ट्रिकसाठी सुशील कुमार सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 04:33 PM2018-04-02T16:33:43+5:302018-04-02T16:33:43+5:30
राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये तर सुशीलने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. 2010 साली नवी दिल्ली आणि 2014 साली ग्लासगो येथे झालेल्या दोन्ही राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सोनेरी यश मिळवले आहे. त्यामुळे आता गोल्डकोस्ट येथे सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी सुशील सज्ज झाला असेल.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे यावेळी कोणता खेळाडू कशी कामगिरी करतो, यावर सर्वांचे लक्ष लागून राहीलेले असेल. यामध्ये सर्वात अग्रस्थानी असेल तो कुस्तीपटू सुशील कुमार.
भारताला ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत दोन पदके जिंकवून देणारा एकमेव क्रीडापटू, अशी सुशील कुमारची ओळख आहे. बीजिंग आणि लंडन या दोन ऑलिम्पिकमध्ये सुशीलने पदकं जिंकली आहेत. त्याचबरोबर खाशाबा जाधव यांच्यानंतर कुस्ती या खेळाला जर कुणी वलय मिळवून दिले असेल तर ते सुशीलनेच. कारण 2012 साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्याने कांस्यपदक जिंकल्यानंतर भारतातील बरीच मुलं कुस्तीकडे वळाली.
राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये तर सुशीलने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. 2010 साली नवी दिल्ली आणि 2014 साली ग्लासगो येथे झालेल्या दोन्ही राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सोनेरी यश मिळवले आहे. त्यामुळे आता गोल्डकोस्ट येथे सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी सुशील सज्ज झाला असेल.
सुशील काही वर्षांपूर्वी 66 किलो वजनी गटामध्ये खेळत होता. कालांतराने तो 74 किलो वजनी गटामध्ये खेळायला लागला. 74 किलो वजनी गटामध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. या गटातून खेळताना त्याने राष्ट्रकुल अजिंक्यपद कुस्ती आणि राष्ट्रीय स्पर्धा जिंकलेली आहे.
नरसिंग यादव प्रकरण
रिओमध्ये 2016 साली झालेल्या ऑलिम्पिकसाठी एकाच गटातून सुशील आणि नरसिंग यांना संधी मिळाली होती. पण दोघांपैकी एकालाच पाठवायचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामध्ये नरसिंगने बाजी मारली. त्यानंतर नरसिंगच्या आहारात सुशीलच्या सांगण्यावरून काही जणांनी उत्तेजक मिळले, असा आरोप झाला होता. याप्रकरणात सुशीलच्या नावाला बट्टा लागला होता. त्यानंतर मात्र कोणतीही मोठी स्पर्धा सुशील अजूनपर्यंत खेळलेला नाही.
राष्ट्रीय स्पर्धेतील वादंग
राष्ट्रीय स्पर्धेत सुशीलने सुवर्णपदक जिंकले खरे, पण याबाबत बराच वाद झाला. कारण या स्पर्धेत सुशीलसमोर असलेल्या सर्व कुस्तीपटूंनी माघार घेतली होती. या कुस्तीपटूंनी माघार घेतली होती, की त्यांना माघार घ्यायला लावली होती, याविषयावर बरीच चर्चा झाली आहे.