बेल्जियमकडून भारत पराभूत
By admin | Published: June 14, 2016 03:59 AM2016-06-14T03:59:52+5:302016-06-14T03:59:52+5:30
बेल्जियमने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना सोमवारी ३६ व्या हीरो चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताचा २-१ ने पराभव केला.
लंडन : बेल्जियमने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना सोमवारी ३६ व्या हीरो चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताचा २-१ ने पराभव केला.
गेल्या लढतीत यजमान ब्रिटनचा पराभव करीत आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाची या स्पर्धेत बेल्जियमविरुद्धची कामगिरी चांगली झाली, पण बेल्जियमच्या मजबूत बचावाने भारताचे विजयाचे स्वप्न धुळीस मिळाले.
या युरोपियन संघाने २०११ पासून भारतावर वर्चस्व गाजवले आहे. यावेळीही बेल्जियमने वर्चस्व कायम राखले. सातवे मानांकन असलेल्या भारताने यापूर्वीच्या लढतीत ब्रिटनचा २-१ ने पराभव केला होता, तर आॅलिम्पिक चॅम्पियन जर्मनीला ३-३ ने बरोबरीत रोखले. बेल्जियम व भारताच्या खात्यावर समान चार गुण आहेत. आॅस्ट्रेलियन संघ गुणतालिकेत तीन सामन्यानंतर सात गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर ब्रिटन, भारत आणि बेल्जियम हे संघ आहेत.
बेल्जियमचा बचाव भेदण्याचे भारतापुढे कडवे आव्हान होते. बेल्जियमने या लढतीत आठ पेनल्टी कॉर्नर मिळवले, तर भारताला केवळ एक पेनल्टी कॉर्नर मिळवता आला.
बेल्जियमतर्फे अलेक्झांडर हेन्ड्रिक्सने २५ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तोपर्यंत बेल्जियमने चार पेनल्टी कॉर्नर मिळवले होते. भारताने त्यानंतर आक्रमक खेळ केला. ३० व्या मिनिटाला देवेंद्र वाल्मिकीने मैदानी गोल नोंदवत संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. एस. व्ही. सुनीलची गोल करण्याची संधी हुकल्यानंतर रिबाऊंडवर वाल्मिकीने शानदार गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत उभय संघ १-१ ने बरोबरीत होते. तिसऱ्या क्वार्टरमध्ये उभय संघांनी संघर्षपूर्ण खेळ केला. जेरोम ट्युयेन्सने ४४ व्या मिनिटाला गोल नोंदवित संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. बेल्जियमने ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखली. (वृत्तसंस्था)