डेन्मार्ककडून भारत १-४ ने पराभूत
By admin | Published: May 23, 2017 04:32 AM2017-05-23T04:32:50+5:302017-05-23T04:32:50+5:30
भारतीय संघाला सुदीरमन कप मिश्र टीम चॅम्पियनशिपच्या पहिल्या लढतीत डेन्मार्कविरुद्ध १-४ ने पराभव स्वीकारावा लागला.
गोल्ड कोस्ट : भारतीय संघाला सुदीरमन कप मिश्र टीम चॅम्पियनशिपच्या पहिल्या लढतीत डेन्मार्कविरुद्ध १-४ ने पराभव स्वीकारावा लागला. स्टार बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधू विजय मिळवणारी एकमेव खेळाडू ठरली.
दोनदा उपविजेता ठरलेल्या डेन्मार्क संघाविरुद्ध भारताची सुरुवात निराशाजनक झाली. मिश्र दुहेरी, पुरुष एकेरी आणि पुरुष दुहेरी अशा तीन लढतींमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारतीय संघ सुरुवातीलाच पाच सामन्यांच्या लढतीत ०-३ ने पिछाडीवर होता. लढतीचा प्रारंभ अश्विनी पोनप्पा व युवा सात्विक साईराज रंकीरेड्डी या जोडीने केला. त्यांना जोकिम फिश्न नील्सन व ख्रिस्टिना पेडरसन या लंडन आॅलिम्पिकमधील कांस्यपदकविजेत्या जोडीविरुद्ध संघर्षपूर्ण खेळानंतर १५-२१, २१-१६, १७-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावर असलेला खेळाडू अजय जयरामकडून भारतीय संघाला मोठी आशा होती. त्याने अलीकडेच मलेशिया ओपनमध्ये व्हिक्टर एक्सेलसेनचा पराभव केला होता, पण येथे जयरामला केवळ २७ मिनिटांमध्ये १२-२१, ७-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे भारतीय संघ ०-२ ने पिछाडीवर पडला.
पुरुष दुहेरीमध्ये मनू अत्री व बी. सुमित रेड्डी यांना माथियास बोए व कार्स्टन मोगेनसन या माजी आॅलिम्पिक रौप्यपदकविजेत्या जोडीविरुद्ध ३३ मिनिटांच्या खेळात १७-२१, १५-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.
आॅलिम्पिक रौप्यपदकविजेत्या सिंधूने त्यानंतर महिला एकेरीमध्ये लिने कार्सफेल्टचा ३२ मिनिटांमध्ये २१-१८, २१-१६ ने पराभव करीत क्लीनस्वीपची नामुष्की टाळली. पाचव्या व अंतिम लढतीत अश्विनी व एन. सिक्की रेड्डी या महिला दुहेरीच्या जोडीने कडवा संघर्ष केला, पण अखेर त्यांना कामिला राईट जुल व ख्रिस्टिना या आॅलिम्पिक रौप्यपदकविजेत्या जोडीविरुद्ध २१-१८, १५-२१, २१-२३ ने पराभव स्वीकारावा लागला. डेन्मार्कने या लढतीत ४-१ ने सरशी साधताना वर्चस्व गाजवले. भारताला पुढच्या लढतीत माजी चॅम्पियन इंडोनेशियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.