अंतिम लढतीत भारत कोरियाकडून पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 02:36 AM2018-05-21T02:36:01+5:302018-05-21T02:36:01+5:30
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी : योंगसिल लीने नोंदविलेला गोल ठरला निर्णायक
डोंगाई सिटी (कोरिया) : भारतीय महिला हॉकी संघाला जेतेपद राखण्यात अखेर अपयश आले. पाचव्या महिला आशियाई चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम लढतीत रविवारी भारताला दक्षिण कोरियाविरुद्ध ०-१ ने पराभव स्वीकारावा लागला. दक्षिण कोरियाने बचाव अभेद्य राखला. त्यांच्यातर्फे योंगसिल लीने २४ व्या मिनिटाला नोंदवलेला मैदानी गोल अखेर निर्णायक ठरला.
दक्षिण कोरियाने भारतीय बचाव फळीची सुरुवातीला चांगली परीक्षा घेतली. त्यांनी मधल्या फळीत चेंडूवर नियंत्रण राखत भारतावर दडपण आणले. भारतानेही त्यांना चोख उत्तर दिले. दक्षिण कोरियाला काही चांगल्या संधी मिळाल्या, पण सुरुवातीच्या १५ मिनिटांमध्ये गोलफलक कोराच होता. कोरियाने त्यानंतर वर्चस्व गाजवत दोन मिनिटांमध्ये तीन पेनल्टी कॉर्नर मिळवले. भारतीय गोलकिपर सविताने चांगली कामगिरी करीत संघावरील संकट टाळले. कोरियाला अखेर २४ व्या मिनिटाला गोल नोंदवण्यात यश आले. मी ह्यून पार्कने उजव्या बाजूने बेसलाईनपासून चेंडूवर नियंत्रण राखत आगेकूच केली. तिने भारतीय गोलक्षेत्रात पास दिला आणि लीने दिशा देत चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला.
पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघाने लय गमावली. भारताने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, पण कोरियन खेळाडूंनी चांगला बचाव केला. कोरियाला ४३ व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवण्याची संधी होती, पण मी ह्यून पार्कच्या फटक्यावर सविताने चांगला बचाव केला. कोरियाने त्याने एक मिनिटाने चौथा पेनल्टी कॉर्नर मिळवला, पण सविताने त्यांना आघाडी वाढविण्याची संधी दिली नाही.
अखेरच्या क्वार्टरमध्ये कोरियन खेळाडूंनी चेंडूवर नियंत्रण राखण्याची भूमिका स्वीकारली. त्यांनी भारताच्या आघाडीच्या फळीला संधी मिळणार नाही, याची खबरदारी घेतली. भारताने गोलकिपर सविताच्या स्थानी अतिरिक्त खेळाडूला खेळविले, पण कोरियाच्या अभेद्य बचाव भेदण्यात यश आले नाही.
दक्षिण कोरियाने तिसऱ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. यापूर्वी २०१० व २०११ मध्ये त्यांनी जेतेपद पटकावले होते. भारताला दुसºयांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यापूर्वी २०१३ मध्ये अंतिम लढतीत भारताला जपानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय स्ट्रायकर वंदना कटारिया स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली, तर युवा लालरेमसियामी उदयोन्मुख खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली. स्ट्रायकर नवनीत कौर व वंदना कटारिया आणि चीनची झियोमिंग सोंग यांनी या स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदवले. (वृत्तसंस्था)