भारताकडून उरुग्वे पराभूत
By Admin | Published: April 3, 2017 12:33 AM2017-04-03T00:33:53+5:302017-04-03T00:33:53+5:30
पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव करीत महिला हॉकी विश्व लीग राऊंड २ मध्ये आपली सुरुवात विजयाने केली आहे.
वेस्ट वँकुवर : भारतीय महिला हॉकी संघाने उरुग्वे संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव करीत महिला हॉकी विश्व लीग राऊंड २ मध्ये आपली सुरुवात विजयाने केली आहे. निर्धारित वेळेत दोन्ही संघ २-२ गोलने बरोबरीत होते. त्यानंतर कर्णधार राणी, मोनिका, दीपिका आणि नवजोत कौर यांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये गोल मारत भारताला विजय मिळवून दिला.
या लढतीत भारताची सुरुवात चांगली झाली आणि त्यांनी सहाव्या मिनिटालाच कर्णधार राणीने केलेल्या गोलच्या बळावर १-0 अशी आघाडी मिळवली.भारताने तिसऱ्या क्वॉर्टरपर्यंत आघाडी कायम ठेवली; परंतु उरुग्वेने ४५ व्या मिनिटाला मारिया टेरेसा वियाना आक हिच्या गोलच्या बळावर बरोबरी साधली. अखेरच्या क्वॉर्टरमध्ये वंदना कटारिया हिने ४९ व्या मिनिटाला गोल करीत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली; परंतु बचावफळीतील चुकीमुळे ५४ व्या मिनिटाला भारताने पेनल्टी स्ट्रोक गमावला.
ज्यावर उरुग्वेच्या मॅनुएला विलारने गोल करीत त्यांच्या संघाला बरोबरी साधून दिली. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताची अनुभवी गोलरक्षक सविताने शानदार कामगिरी करताना भारताचा ४-२ असा विजय निश्चित केला.(वृत्तसंस्था)