भारत पराभूत
By admin | Published: June 29, 2015 01:24 AM2015-06-29T01:24:33+5:302015-06-29T12:01:18+5:30
आॅस्ट्रेलियाने विश्व हॉकी लीग सेमी फायनलमध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या ‘अ’ गटाच्या लढतीत भारताचा ६-२ ने पराभव केला.
एन्टवर्प : स्टार स्ट्रायकर जेमी ड्वायर व ड्रॅग फ्लिकर ख्रिस सिरेलोच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने विश्व हॉकी लीग सेमी फायनलमध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या ‘अ’ गटाच्या लढतीत भारताचा ६-२ ने पराभव केला. आॅस्ट्रेलियातर्फे एरेन जालेवस्की (८ वा मिनिट), ड्वायर (१४ वा मिनिट), सिरेलो (२६, ३३ व ४४ वा मिनिट) आणि किरेन गोव्हर्स (४२ वा मिनिट) यांनी गोल नोंदवला. भारतातर्फे वीरेंद्र लाकडा (३४ वा मिनिट) आणि रमणदीप सिंग (५१ वा मिनिट) यांनी गोल केले.
या विजयासह आॅस्ट्रेलियाने ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावले. त्यांनी साखळी फेरीत १२ गुणांची कमाई केली. रिओ आॅलिम्पिक २०१६ साठी यापूर्वीच पात्रता मिळविणाऱ्या भारतीय संघाचा लीगमध्ये पहिला पराभव ठरला. भारतीय संघाच्या खात्यात सात गुणांची नोंद असून साखळी फेरीत ‘अ’ गटात त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आॅस्ट्रेलियाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. जेमी ड्वायरने पहिल्याच मिनिटाला भारतीय ‘डी’मध्ये मुसंडी मारताना आपाला निर्धार जाहीर केला. भारतीय खेळाडूंनी त्यावेळी त्याचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. सातव्या मिनिटाला ड्वायरने चिंगलेनसानाकडून चेंडू हिसकावत जालेवस्कीला पास दिला. जालेवस्कीने चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवीत आॅस्ट्रेलियाचे खाते उघडले.
त्यानंतर भारताने बचावात्मक पवित्रा स्वीकारला. दरम्यान, श्रीजेशने ब्लॅक गोव्हर्सचा फटका रोखत आॅस्ट्रेलियाचे आक्रमण परतावून लावले. त्यानंतर ड्वायरने स्टिकवर्कचा शानदार नमुना सादर करताना ट्रिस्टेन व्हाईटने दिलेल्या पासवर चेंडूला गोलजाळ्यात पोहचविले. आॅस्ट्रेलियाने पहिल्या क्वार्टरमध्ये २-० अशी आघाडी घेतली होती. मध्यंतराला खेळ थांबला त्यावेळी आॅस्ट्रेलिया संघ ३-० ने आघाडीवर होता. मध्यंतरानंतरही आॅस्ट्रेलियाने आक्रमक पवित्रा कायम राखला. रेफरलच्या आधारावर मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर सिरेलोने गोल नोंदवीत संघाला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. जसजित सिंगचा फ्लिक चुकल्यानंतर वीरेंद्र लाकडाने दुसऱ्या रिबाऊंडवर गोल नोंदवीत भारतीय संघाला दिलासा दिला.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आॅस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर बहाल करण्याच्या रेफरीच्या निर्णयाला रेफरलच्या आधारावर बदलले. प्रतिस्पर्धी संघाने आक्रमक पवित्रा कायम राखताना मिळालेल्या संधीवर किरेन गोव्हर्सने गोल नोंदवीत वर्चस्व कायम राखले. त्यानंतर आॅस्ट्रेलियाला चौथा पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर सिरेलोने गोल नोंदवीत हॅट्ट्रिक पूर्ण केली. रमणदीप अखेरच्या क्वार्टरमध्ये मैदानावर उतरला आणि त्याने गोल नोंदवीत प्रतिस्पर्धी संघाला दखल घेण्यास भाग पाडले. त्याला धर्मवीर व आकाशदीप सिंग यांची योग्य साथ लाभली. (वृत्तसंस्था)
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आक्रमक सुरुवात केली. गुरमेल सिंगने चांगली चाल रचली, पण त्याला गोल नोंदविता आला नाही. त्यानंतर आॅस्ट्रेलियाने केलेले आक्रमण श्रीजेश व वीरेंद्र लाकडा यांनी थोपवले. आॅस्ट्रेलियाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर श्रीजेशने सुरुवातीचे आक्रमण परतावून लावले. पण रिबाऊंडवर मिळालेल्या संधीवर सिरेलोने गोल नोंदवीत संघाला ३-० अशी अघाडी मिळवून दिली. मध्यंतराला तीन मिनिटांचा अवधी शिल्लक असताना आॅस्ट्रेलियाला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण श्रीजेशने उत्कृष्ट बचाव करीत त्यांचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले.