भारत ‘अ’ इंग्लंडविरुध्द पराभूत
By Admin | Published: January 10, 2017 09:44 PM2017-01-10T21:44:36+5:302017-01-10T21:54:38+5:30
अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या टिच्चून मा-यानंतरही भारत ‘अ’ संघाला पहिल्या सराव सामन्यात इंग्लंड इलेव्हन संघाविरुद्ध ३ विकेट्सने पराभूत व्हावे लागले. यासह महेंद्रसिंग धोनीचे
>- रोहित नाईक/ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या टिच्चून मा-यानंतरही भारत ‘अ’ संघाला पहिल्या सराव सामन्यात इंग्लंड इलेव्हन संघाविरुद्ध ३ विकेट्सने पराभूत व्हावे लागले. यासह महेंद्रसिंग धोनीचे भारतीय संघासाठी अखेरचे नेतृत्व अपयशी ठरले. भारत ‘अ’ संघाने दिलेले 305 धावांचे आव्हान इंग्लंडने ७ फलंदाजांच्या मोबदल्यात ४८.५ षटकात पार केले. विशेष म्हणजे चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याने ६० धावांत ५ बळी घेऊनही भारताला पराभूत व्हावे लागले.
येथील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सॅम बिलिंग्सने ८५ चेंडूत ८ चौकारांसह ९३ धावांची खेळी करुन इंग्लंडच्या विजयात मोलाचे योगदान दिले. सलामीवीर जेसन रॉयने देखील ५७ चेंडूत ९ चौकार व २ षटकारांसह ६२ धावांची खेळी केली. एकवेळ इंग्लंडची ३०.४ षटकात ५ बाद १९१ धावा अशी अवस्था होती. यावेळी सामना समान स्थितीत होता. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करुन इंग्लिंश फलंदाजांना जखडवून ठेवले होते. मात्र, बिलिंग्स आणि लियाम डॉसन (४१) यांनी इंग्लंडला विजयी मार्गावर आणले.
तत्पुर्वी, नाणेफेक जिंकून इंग्लंड कर्णधार इआॅन मॉर्गन याने क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर मनदीप सिंग (८) झटपट परतला. मात्र, धवन - रायडू यांनी संघाला सावरताना दुसºया विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली. जॅक बॉलने धवनला बाद करुन ही जोडी फोडली. धवन ८४ चेंडूत ८ चौकार व एका षटकारासह ६३ धावा काढून परतला. यानंतर रायडू - युवराज यांनी तिसºया विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. रायडू ९७ चेंडूत ११ चौकार व एका षटकारासह १०० धावा काढून रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर युवी, धोनी यांनी भारत ‘अ’ संघाला तीनशेचा पल्ला पार करुन दिला.
युवराज सिंगने अडखळत्या सुरुवातीनंतर शानदार फटकेबाजी करीत प्रेक्षकांना खुश केले. त्याने ४८ चेंडूत ६ चौकार व २ षटकार मारत ५६ धावांची दमदार खेळी केली. तर, ४१व्या षटकात रायडूने आपले शतक पुर्ण केल्यानंतर मैदान सोडण्याचा निर्णय घेतला आणि आगमन झाले कर्णधर धोनीचे. धोनीने अखेरपर्यंत नाबाद राहत ४० चेंडूत ८ चौकार व २ षटकरांसह ६८ धावा केल्या.
धावफलक : -
भारत ‘अ’ : मनदीप सिंग त्रि. गो. विली ८, शिखर धवन झे. बटलर गो. बॉल ६३, अंबाती रायडू रिटायर्ड हर्ट १००, युवराज सिंग झे. रशिद गो. बॉल ५६, महेंद्रसिंग धोनी नाबाद ६८, संजू सॅमसन झे. हेल्स गो. विली ०, हार्दिक पांड्या नाबाद ४. अवांतर - ५. एकूण : ५० षटकात ४ बाद ३०४ धावा.
गोलंदाजी : ख्रिस वोक्स १०-१-७१-०; डेव्हीड विली १०-१-५५-२; मोईन अली १०-०-४२-०; जॅक बॉल १०-०-६१-२; आदिल रशिद ८-०-४९-०; लियाम डॉसन २-०-२४-०.
इंग्लंड : जेसन रॉय झे. शर्मा गो. कुलदीप ६२, अॅलेक्स हेल्स झे. सॅमसन गो. कुलदीप ४०, सॅम बिलिंग्स त्रि. गो. पांड्या ९३, इआॅन मॉर्गन झे. धवन गो. चहल ३, जोस बटलर झे. शर्मा गो. कुलदीप ४६, मोईन अली पायचीत गो. कुलदीप ०, लियाम डॉसन झे. व गो. कुलदीप ४१, ख्रिस वोक्स नाबाद ११, आदिल रशिद नाबाद ६. अवांतर - ५. एकूण : ४८.५ षटकात ७ बाद ३०७ धावा.
गोलंदाजी : आशिष नेहरा ६-०-५०-०; हार्दिक पांड्या ९.५-१-४८-१; मोहित शर्मा ९-०-५८-०; युझवेंद्र चहल १०-०-५६-१; कुलदीप यादव १०-१-६०-५; युवराज सिंग ४-०-३२-०.