ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2016 05:48 AM2016-06-17T05:48:26+5:302016-06-17T06:40:49+5:30
आशियाई स्पर्धेतील सुवर्ण पदकविजेता भारतीय संघ विश्वविजेता आॅस्ट्रेलियाचे आव्हान पार करू शकला नाही. आणि गुरुवारी एफआयएफ चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेच्या सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून
Next
>- इंग्लंड-बेल्जियम लढतीच्या निकालावर भवितव्य अवलंबून
लंडन : आशियाई स्पर्धेतील सुवर्ण पदकविजेता भारतीय संघ विश्वविजेता ऑस्ट्रेलियाचे आव्हान पार करू शकला नाही. गुरुवारी झालेल्या एफआयएफ चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून २-४ ने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे भारताचे भवितव्य इंग्लंड-बेल्जियम लढतीच्या निकालावर अवलंबून आहे.
ऑस्ट्रेलियाने मंगळवारी बेल्जियमला २-० ने पराभूत करत अंतिम सामन्यात स्थान मिळवले, तर भारताने अन्य आशियाई संघ दक्षिण कोरियाला २-१ ने पराभूत करीत अंतिम फेरीच्या आशा कायम ठेवल्या होत्या; मात्र अंतिम सामन्यात प्रवेशासाठी ऑस्ट्रेलियासोबत ड्रॉ खेळण्याची गरज होती; मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला.
या स्पर्धेत आतापर्यंत शानदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नाही़ ऑस्ट्रेलिया संघाने एका पाठोपाठ एक पेनल्टी कॉर्नर मिळविले. ज्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला, दुसरीकडे भारतीय संघाला ३ पेनल्टी कॉर्नर मिळूनसुद्धा त्याचा त्यांना उपयोग करून घेता आला नाही.
ऑस्ट्रेलिया संघाला पहिला पेनल्टी कॉर्नर १०व्या मिनिटाला मिळाला, परंतु कर्णधार श्रीजेशने चेंडू अडविला. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये १८, १९ आणि २०व्या मिनिटाला सलग पेनल्टी कॉर्नर मिळविले़ यावेळी सुद्धा श्रीजेशने २ पेनल्टी कॉर्नर अडविले व २०व्या मिनिटाच्या पेनल्टी कॉर्नरवर ट्रेंट मिटनने चेंडू गोलमध्ये टाकला.
या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांतून १३ गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले, तर भारताच्या खात्यावर ७ गुण आहेत. इंग्लंडच्या खात्यावर ५ गुण असून, ते विजयासह अंतिम फेरी गाठू शकतात. जर बेल्जियम हा सामना जिंकल्यास भारताची गुणांची बरोबरी होईल आणि या परिस्थितीत गोलफरकामध्ये सरस असलेला संघ अंतिम फेरी गाठेल. मात्र ही लढत बरोबरीत सुटल्यास भारत थेट अंतिम फेरी गाठणार आहे.
- ऑस्ट्रेलियाकडून ट्रेंट मिटन याने २० व्या, अरान जालेवस्की २३ व्या, फ्लाइन ओगिलवी ३५ व्या आणि ट्र्स्टिन व्हाइट याने ४५ व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला.
- भारताकडून व्ही. रघुनाथ याने ४५ व्या, तर ४९ व्या मिनिटाला मनदीप सिंह यांनी गोल केले.