भारतावर पराभवाचे सावट
By admin | Published: July 31, 2014 04:59 AM2014-07-31T04:59:19+5:302014-07-31T04:59:19+5:30
आघाडीच्या फलंदाजांनी बेपवाई वृत्ती दाखविल्यामुळे इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर बुधवारी टीम इंडियावर पराभवाचे सावट आले
साऊथम्प्टन : आघाडीच्या फलंदाजांनी बेपवाई वृत्ती दाखविल्यामुळे इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर बुधवारी टीम इंडियावर पराभवाचे सावट आले. ४४५ धावांचे अतिशय कठीण विजयी लक्ष्य गाठताना दुसऱ्या डावात ४२ षटकांत ११२ धावांत ४ गडी गमावल्याने हे संकट अधिकच गडद झाले आहे.
भारताला अद्याप ३३३ धावांचा पल्ला सर करण्याचे आव्हान असून, अखेरच्या दिवशी सहा गडी शिल्लक आहेत. मालिकेत १-० ने आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाला गुरुवारी प्रतिस्पर्धी माऱ्याला धाडसाने तोंड देत सामना वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, हे देखील तितकेच खरे.
मुरली विजय १२ धावा काढून बाद झाला, तर चेतेश्वर पुजाराने दोन धावांवर नांगी टाकली. शिखर धवन तारणहार ठरणार असे वाटत असताना तोदेखील ३७ धावांवर बाद झाला. फॉर्ममध्ये नसलेला विराट कोहली २८ धावा काढून परतला. खेळ थांबला तेव्हा अजिंक्य रहाणे १८ आणि रोहित शर्मा सहा धावांवर नाबाद होते.
विजय आणि पुजारा हे तीन धावांच्या फरकाने बाद झाले. त्यानंतर शिखर आणि विराट देखील नऊ धावांच्या फरकाने परत आले. शिखरला ज्यो रुट याने बाद केले, तर आॅफस्पिनर मोईन अली याने पुजारा आणि विराटला आपले लक्ष्य बनविले.
तत्पूर्वी, कर्णधार अॅलेस्टर कूक (नाबाद ७०) आणि जो रूट (५६) यांच्या फलंदाजीमुळे यजमान इंग्लंड संघ ४ बाद २०५ धावांवर पोहोचल्यानंतर त्यांनी त्यांचा दुसरा डाव घोषित केला. भारताला विजयासाठी ४४५ धावांचे लक्ष्य दिले. तत्पूर्वी, पहिल्या डावात केलेल्या ५६९ धावांचा पाठलाग करताना, भारतीय संघाची दाणादाण उडाली. भारताचा पहिला डाव ३३० धावांत गुंडाळून इंग्लंडने तिसऱ्या कसोटीवर मजबूत पकड घेतली. कर्णधार अॅलेस्टर कुक आणि गॅरी बॅलेंस यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी करून उपाहारापर्यंत ३१९ धावांची आघाडी मिळवून दिली. उपाहारापर्यंत यजमानांनी २ बाद ८० धावा केल्या होत्या. इंग्लंडने पहिला डाव ७ बाद ५६९ धावांवर घोषित केला. त्या उत्तरात उतरलेल्या भारतीय संघाला ३३० धावाच बनवण्यात यश आले. भारताने कालच्या ८ बाद ३२३ धावांवरून बुधवारी सुरुवात केली आणि अवघ्या सात धावांची भर टाकून भारताचा संपूर्ण संघ तंबूत परतला.