भारताने फलंदाजीमध्ये कमी प्रयोग केले
By admin | Published: July 8, 2017 01:20 AM2017-07-08T01:20:04+5:302017-07-08T01:20:04+5:30
अखेर भारताने ३-१ अशा मोठ्या फरकाने विंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली; पण एकवेळ असेही वाटत होते की, जर वेस्ट इंडिज अखेरचा सामना
- अयाझ मेमन
संपादकीय सल्लागार
अखेर भारताने ३-१ अशा मोठ्या फरकाने विंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली; पण एकवेळ असेही वाटत होते की, जर वेस्ट इंडिज अखेरचा सामना जिंकण्यात यशस्वी ठरले, तर भारतासाठी हा मोठा धक्का बसला असता. कारण भारत तिसऱ्या क्रमांकाचा संघ असून, विंडीज नवव्या स्थानी आहे. अशा परिस्थितीमध्ये हे सर्व अनपेक्षित ठरले असते. पाचवा सामना जिंकण्यात अपयश आले असते, तर भारताच्या प्रतिष्ठेला आणि खेळाडूंच्या आत्मविश्वासालाही नक्कीच मोठा झटका बसला असता. त्यामुळेच हा सामना खूप महत्त्वाचा होता. खास करून विराट कोहलीसाठी हा सामना महत्त्वाचा होता. केवळ फलंदाज म्हणून नाही, तर कर्णधार म्हणून जर का ही मलिका बरोबरीत सुटली असती, तर त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले असते.
ज्याप्रकारे त्याच्यात आणि प्रशिक्षकामध्ये वाद झाला, ते पाहता त्याच्यावर स्वत:ला सिद्ध करण्याचा दबाव होता आणि त्याने ते केले. कोहलीने एक शतक ठोकले. त्याचे हे २८ वे शतक ठरले. ही जबरदस्त कामगिरी आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याने कर्णधार म्हणून जिंकण्याची जी जबाबदारी घेतली होती, त्यात तो यशस्वी ठरला. अखेरपर्यंत टिकून राहताना त्याने संघाला विजयी मार्गावर नेले. केवळ स्वत:साठी न खेळता संघाला विजयापर्यंत नेणे, ही महान खेळाडूची एक ओळख असते.
कोहलीला या सामन्यात दिनेश कार्तिकने चांगल्या प्रकारे साथ दिली. विशेष म्हणजे, खेळाडूंच्या बदलाविषयी केलेले प्रयोग विशेष वाटले नाहीत. युवराज जखमी होता. त्याच्या जागी आलेल्या कार्तिकविषयी जास्त काही सांगायची आवश्यकता नाही. तो दहा वर्षांपासून खेळत आहे. इथे त्याला चांगली संधी मिळाली. तसेच रिषभ पंतला आजमवायला पाहिजे होते. आगामी विश्वचषकच्यादृष्टीने त्याची तयारी पाहता आली असती. त्यामुळे ही एक संधी भारताने गमावली असल्याचे मला वाटते. मालिकेत संघात फारसे बदल करण्यात आले नाहीत. सातत्यपूर्ण कामगिरी मान्य आहे; पण प्रयोग करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
गोलंदाजीत चांगल्या प्रकारे प्रयोग करण्यात आले. मोहम्मद शमीने पुनरागमन करीत चार बळी घेतले. त्याच्या व्यतिरिक्त उमेश यादवने चांगली गोलंदाजी केली. कुलदीप यादवने वेगळी छाप पाडली. गोलंदाजीमध्ये प्रत्येकाने छाप पाडली. वेगवान गोलंदाज वेगवान गोलंदाजांवर, तर फिरकी गोलंदाज फिरकी गोलंदाजांवर दडपण टाकीत होते. असाच प्रकार फलंदाजीमध्येही व्हायला पाहिजे होता. संघातील जागा कोणीही गृहित धरू शकत नाही आणि हाच दृष्टिकोन असायला हवा, हे माझे मत आहे. यामुळे संघात स्थिरावलेल्या खेळाडूंवरही सातत्यपूर्ण कामगिरीचे दडपण राहील. आता बघूया टी-२० सामन्यात काय होतंय ते.