विजयासाठी भारत उत्सुक
By admin | Published: June 17, 2017 02:52 AM2017-06-17T02:52:59+5:302017-06-17T02:52:59+5:30
विश्व हॉकी लीग सेमीफायनल्समध्ये भारताने स्कॉटलंडवर विजय मिळवल्यानंतर शनिवारी भारताचा पुढचा सामना पुल बी मध्ये कॅनडासोबत होणार आहे.
लंडन : विश्व हॉकी लीग सेमीफायनल्समध्ये भारताने स्कॉटलंडवर विजय मिळवल्यानंतर शनिवारी भारताचा पुढचा सामना पुल बी मध्ये कॅनडासोबत होणार आहे. ही विजयी लय राखण्यास भारतीय संघ उत्सुक असेल.
जगातील सहाव्या क्रमांकाचा संघ असलेल्या भारताकडे या विजयासह ग्रुपमध्ये चांगली स्थिती बनवण्याची संधी आहे. त्यानंतर भारताचा सामना पांरपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि नेदरलॅण्डसोबत होणार आहे. या सामन्यातदेखील भारताला विजयाचे दावेदार मानले जात आहे. कॅनडाच्या संघात काही खेळाडू भारतीय वंशाचे आहेत.
रोलेंट आॅल्टमन्स यांच्या संघाला मात्र सावध रहावे लागले. कारण स्कॉटलंडने भारताविरोधात पहिल्याच क्वार्टरमध्ये आघाडी घेतली होती. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये भारतीय संघाला अडचणींचा सामना करावा लागला होता. स्कॉटलंड विरोधात भारताने संथ सुरुवात केली होती. त्याचा फायदा घेत विरोधी संघाने मोठी आघाडी घेतली.
उद्या होणाऱ्या सामन्यातील विजयानंतर भारताचा संघा उपांत्यपूर्व फेरीत नक्कीच पोहचू शकतो. भारतीय संघाला उद्याच्या सामन्यात त्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. स्कॉटलंड विरोधातील सामन्यात बचाव फळीने चांगली सुरुवात केली नव्हती. स्पर्धेपूर्वीच भारताचा बचावफळीतील खेळाडू रुपिंदरपाल सिंह जखमी झाल्याने प्रशिक्षक रोलेंट ओल्टमन्स यांना त्याची कल्पना होती.
रुपिंदरच्या अनुपस्थितीत कोथाजित सिंह अणि हरमनप्रीत सिंह यांना बचावाची जबाबदारी घ्यावी लागेल. मिडफिल्डची जबाबदारी सरदारा सिंह आणि कर्णधार मनप्रित सिंह यांच्याकडे आहे. हे दोन्ही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तर आघाडीच्या खेळाडूंनी पहिल्या सामन्यात चांगलेच प्रभावित केले.
कॅनडाचा संघ या स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळणार आहे. तसेच भारताविरोधात विजय मिळवण्यासाठी हे दोन्ही खेळाडू प्रयत्नशील असतील. (वृत्तसंस्था)