भारत-इंग्लंड लढत आजपासून
By admin | Published: February 13, 2017 12:00 AM2017-02-13T00:00:46+5:302017-02-13T00:00:46+5:30
भारत आणि इंग्लंड युवा (अंडर-१९) संघांदरम्यान चार दिवसीय कसोटी सामन्याला सोमवारपासून व्हीसीए जामठा स्टेडियमवर प्रारंभ
नागपूर : भारत आणि इंग्लंड युवा (अंडर-१९) संघांदरम्यान चार दिवसीय कसोटी सामन्याला सोमवारपासून व्हीसीए जामठा स्टेडियमवर प्रारंभ होत आहे.
वन-डे मालिकेत सरशी साधणारा यजमान भारतीय संघ कामगिरीत सातत्य राखण्यात उत्सुक आहे. वन-डे मालिकेतील पराभवाचा हिशेब चुकता करण्यास पाहुणा
संघ प्रयत्नशील असल्यामुळे सोमवारपासून रंगणाऱ्या लढतीत चुरस अनुभवाला मिळणार आहे.
मुंबईत खेळल्या गेलेल्या वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-१ ने सरशी साधली. पाचवा सामना बरोबरीत संपला. जाँटी सिद्धूच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने प्रशिक्षक राहुल द्रविड व गोलंदाजी प्रशिक्षक पारस
म्हाम्ब्रे यांच्या मार्गदर्शनात कसून सराव केला.
मॅट फिशरच्या नेतृत्वाखाली खेळणार इंग्लंड संघाने आज सराव केला. (क्रीडा प्रतिनिधी)
खेळाडूंनी संधीचा लाभ घ्यावा
भारतीय संघात प्रतिभावान खेळाडूंचा समावेश असून, इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यांनी चमकदार कामगिरी करीत आपली छाप सोडवी, असे मत भारतीय युवा संघाचे गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी व्यक्त केले. वन-डे व कसोटी क्रिकेटमध्ये फरक असतो. वन-डे संघात संधी न मिळालेल्या खेळाडूंना कसोटी संघात छाप सोडण्याची संधी आहे. वन-डे मालिकेत पराभव स्वीकारणाऱ्या इंग्लंड संघाला आम्ही कमी लेखण्याची चूक करणार नाही. संघातील अनेक खेळाडूंनी स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करीत लक्ष वेधले आहे. आता त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर क्षमता सिद्ध करावी लागेल. त्यामुळे सोमवारी लढतीपूवीच अंतिम संघ निश्चित करण्यात येईल, असेही म्हाम्ब्रे यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रतिस्पर्धी संघ- भारत : जाँटी सिद्धू (कर्णधार), अभिषेक गोस्वामी, रोहन कुन्नूम्मल, सौरभ सिंग, रविंदर ठाकूर, उत्कर्ष सिंग, विनीत पनवर, डॅरिल फेरारियो, सिद्घार्थ आकरे, लोकेश्वर, मयंक मार्कंडे, सिमॉन जोसेफ, हर्ष त्यागी, रिषभ भगत, कनिष्क सेठ.
इंग्लंड : मॅट फिशर (कर्णधार), मॅक्स होल्डन, आरोन बियर्ड, टॉम बँटन, हेन्री ब्रुक्स, जॉर्ज बारटेट, जॅक ब्लेथरविक, लुई शॉ, युआन वुड्स, हॅरी ब्रुक, डेलरे रालिन्स, आर्थर गोडसल, ओली पोप, विल जॅक्स, लियाम पॅटरसन.