भारत, इंग्लंड संघ नागपुरात
By admin | Published: January 28, 2017 12:41 AM2017-01-28T00:41:14+5:302017-01-28T00:41:14+5:30
विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममध्ये २९ जानेवारी (रविवारी) रोजी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी यजमान भारत आणि पाहुणा इंग्लंड संघ
नागपूर : विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममध्ये २९ जानेवारी (रविवारी) रोजी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी यजमान भारत आणि पाहुणा इंग्लंड संघ आज, शुक्रवारी नागपुरात डेरेदाखल झाला. निर्धारित वेळपूर्वीच उभय संघ येथे पोहोचल्यामुळे व्हीसीए पदाधिकारी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना धावपळ करावी लागली.
कानपूर येथे गुरुवारी खेळल्या गेलेल्या लढतीनंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि इयोन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाचे लखनौ येथून विशेष विमानाने नागपुरात आगमन झाले.
स्थानिक विदर्भ क्रिकेट असोसिएशनने उभय संघ दुपारी २ वाजता येथे पोहोचणार असल्याचे कळविले होते, पण उभय संघांचे निर्धारित वेळेपूर्वीच १२.४० वाजता येथे आगमन झाले. विमानतळाहून कडक सुरक्षा व्यवस्थेत उभय संघ लक्झरी बसने वर्धा मार्गावरील हॉटले रेडिसन ब्ल्यूकडे रवाना झाले.
तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत पहिल्या लढतीत विजय मिळवित १-० ने आघाडी घेणारा इंग्लंड संघ शनिवारी दुपारी १ ते ४ या वेळेत सराव करणार आहे. मालिकेत बरोबरी साधण्यास उत्सुक असलेला भारतीय संघ सकाळी दहा वाजता आणि इंग्लंडचा संघ दुपारी साडेबारा वाजता सराव करणार आहे. कसोटी मालिका व वन-डे सामन्यांची मालिका जिंकणाऱ्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी टी-२० सामन्यांच्या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी रविवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे. चाहत्यांमध्ये या लढतीबाबत प्रचंड उत्सुकता आहे. सर्व तिकीट ‘बुक’ झाल्या असून रविवारी स्टेडियम ‘हाऊसफुल्ल’ राहणार हे निश्चित आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
भारताला विजयाची प्रतीक्षा!
व्हीसीएच्या जामठा मैदानावर याआधी टीम इंडियाने दोन सामने खेळले आहेत. दोन्ही सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागल्याने इंग्लंडविरुद्ध विजयाचे खाते उघडण्याची प्रतीक्षा राहील. ९ डिसेंबर २००९ रोजी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने ५ बाद २१५ धावा उाभरल्या. भारताला ९ बाद १८६ धावांत रोखल्याने भारत २९ धावांनी पराभूत झाला. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध १५ मार्च २०१६ रोजी टी-२० विश्वचषकातील सामन्यात भारताला पराभूत व्हावे लागले. न्यूझीलंडने ७ बाद १२६ धावा उभारल्यानंतर भारताला अवघ्या ७९ धावांत गुंडाळले.
मोहम्मद शमीला पितृशोक
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचे वडील तौसिफ अली यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळेटी-२० संघासोबत असलेला शमी गुरुवारी रात्रीच अमरोहाकडे रवाना झाला.शमी गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर रिहॅबिलिटेशन म्हणून टी-२० संघासोबत होता. गुरुवारी रात्री ११.३० वा. समीसाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली. तो मुरादाबाद मार्ग अमरोहाकडे रवाना झाला.