भारत, इंग्लंड संघांचा सराव
By admin | Published: January 25, 2017 12:36 AM2017-01-25T00:36:24+5:302017-01-25T00:39:53+5:30
भारत आणि इंग्लंड संघांनी ग्रीन पार्कमध्ये २६ जानेवारी रोजी होणाऱ्या पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्याच्या तयारीसाठी मंगळवारी कसून सराव केला.
कानपूर : भारत आणि इंग्लंड संघांनी ग्रीन पार्कमध्ये २६ जानेवारी रोजी होणाऱ्या पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्याच्या तयारीसाठी मंगळवारी कसून सराव केला. सकाळच्या सत्रात इंग्लंड संघाने, तर दुपारच्या सत्रात भारतीय संघाने सराव केला.
इंग्लंड संघाने सराव केला त्या वेळी मीडियाला सराव सत्राचे छायचित्र काढण्याची परवानगी देण्यात आली होती; पण भारतीय संघाच्या सरावाच्या वेळी सुरक्षेच्या कारणास्तव मीडियाला रोखण्यात आले.
उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे (यूपीसीए) मीडिया व्यवस्थापक ए. ए. खान तालिब यांनी सांगितले, की इंग्लंड संघ सकाळी ९ वाजता स्टेडियममध्ये दाखल झाला आणि त्यांनी १२.३० पर्यंत सराव केला. भारतीय संघाने दुपारी १ वाजल्यानंतर सरावाला सुरुवात केली. उभय संघातील सर्वच खेळाडू सराव सत्रामध्ये सहभागी झाले. सरावादरम्यान सुरक्षा व्यवस्था चोख होती. (वृत्तसंस्था)
येथे खेळल्या जाणाऱ्या टी-२० सामन्यात नाणेफेकीचा कौल मिळविणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी करण्यास पसंती द्यायला हवी. कारण अखेरच्या षटकांमध्ये चेंडू स्विंग होत असल्यामुळे येथे फलंदाजी करणे अडचणीचे जाते, असे मत ग्रीन पार्कचे क्युरेटर यांनी व्यक्त केले. फिरकीला अनुकूल ग्रीन पार्कच्या खेळपट्टीवर २६ जानेवारी रोजी पहिला टी-२० सामना खेळला जाणार आहे. या खेळपट्टीवर कसोटीसामन्यादरम्यान चेंडू जेवढा वळतो त्यातुलनेत टी-२० सामन्यादरम्यान चेंडू वळणार नाही, असेही क्युरेटरने म्हटले आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला लाभ मिळेल : क्युरेटर
सामना सायंकाळी ४.३० वाजता सुरू होणार असून ८ वाजेपर्यंत संपेल. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १६० ते १७० धावांपर्यंत मजल मारायला हवी, अशी शक्यता अस्थायी क्युरेटर शिव कुमार यांनी व्यक्त केली.
हिवाळा असल्यामुळे सायंकाळी ५ वाजतानंतर दव पडण्यास सुरुवात होईल. त्याचा गोलंदाजांना लाभ मिळेल. अखेरच्या षटकांमध्ये चेंडू अधिक स्विंग होण्याची शक्यता असल्यामुळे फलंदाजी करणे कठीण होईल.
पहिले धोनी; आता विराट बजावतो खेळाडूंचे मनोधैर्य उंचावण्याची भूमिका : हार्दिक पंड्या
इंग्लंडविरुद्ध कसोटी व वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने सरशी साधल्यामुळे भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला आनंद झाला आहे. दोन्ही मालिका जिंकल्यामुळे मनोधैर्य उंचावलेले असून, २६ जानेवारीपासून प्रारंभ होणाऱ्या टी-२० मालिकेतही संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
सुरुवातीला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी खेळाडूंचे मनोधैर्य उंचावण्याचे कार्य करीत होता, आता तीच भूमिका कर्णधार विराट कोहली बजावत असल्याचे पंड्याने एका उत्तरात स्पष्ट केले. ग्रीन पार्कवर सराव सत्रापूर्वी पत्रकारांसोबत बोलताना पंड्या म्हणाला, ‘‘भारतीय संघ कसोटी व वन-डे मालिकेप्रमाणे टी-२० मालिकेतही कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरेल. संघात काही नवे खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामुळे संघ मजबूत झाला आहे.’’
भारतीय खेळाडू राष्ट्रध्वजाचा बॅच लावून खेळण्याची शक्यता : शुक्ला
भारतीय क्रिकेट संघ २६ जानेवारी रोजी गणराज्य दिनाच्या पर्वावर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान राष्ट्रध्वजाचा बॅच लावून खेळण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश क्रिकेट संघटना (यूपीसीए) याबाबत भारतीय संघ व्यवस्थापनासोबत चर्चा करणार आहे. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी सांगितले, की यूपीसीएतर्फे राष्ट्रध्वजाचे बॅच खेळाडूंसाठी उपलब्ध करून देणार आहे.