भारताचा सामना चीनशी
By admin | Published: May 26, 2017 03:29 AM2017-05-26T03:29:52+5:302017-05-26T03:29:52+5:30
सुदीरमन कप बॅडमिंटन स्पर्धेच्या बाद फेरीत स्थान पटकावणाऱ्या भारतीय संघाला शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत चीनचा अडथळा दूर करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल.
गोल्ड कोस्ट (आॅस्ट्रेलिया) : सुदीरमन कप बॅडमिंटन स्पर्धेच्या बाद फेरीत स्थान पटकावणाऱ्या भारतीय संघाला शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत चीनचा अडथळा दूर करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल.
यापूर्वी, २०११मध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या भारताला चीनकडून १-३ ने पराभवाचा धक्का बसला होता. स्पर्धेच्या २८ वर्षांच्या इतिहासात इंडोनेशिया संघ प्रथमच बाद फेरीपासून वंचित राहिला, हे विशेष. चीन संघात दोन वेळचा आॅलिम्पिक सुवर्णविजेता लीन दान आणि रिओ आॅलिम्पिकचा सुवर्ण विजेता चेन लोंग यांचा समावेश आहे. पुरुष एकेरीत या दोघांना नमविणे भारतासाठी कडवे आव्हान असेल. भारतीय खेळाडूंपैकी केवळ के. श्रीकांत यानेच लीन दानला नमविले आहे. २०१४ च्या चायना ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीकांतने ही कामगिरी केली होती. महिला एकेरीत आॅलिम्पिक रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू हिच्यापुढेही खडतर आव्हान आहे. तिचा सामना जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावरील ही बिंगजियाओ किंवा सहाव्या स्थानावरील सून यू यांच्यापैकी एकीशी होईल. सिंधू मागच्या महिन्यात आशियाई चॅम्पियनशिपमध्ये बिंगजियाओकडून पराभूत झाली. सूनविरुद्ध तिचा रेकॉर्ड ३-४ असा
आहे. अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांनादेखील कडवे आव्हान मिळणार आहे. दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात जपानचा सामना होईल तो मलेशिया विरुद्ध. (वृत्तसंस्था)