भारताची दिमाखात उपांत्य फेरीत धडक

By admin | Published: June 12, 2017 01:03 AM2017-06-12T01:03:45+5:302017-06-12T01:03:45+5:30

दक्षिण आफ्रिकेचा तब्बल ७२ चेंडू आणि आठ विकेटने धुव्वा उडवताना दिमाखात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत उपांत्य फेरीत धडक मारली.

India face the semifinals in the semifinals | भारताची दिमाखात उपांत्य फेरीत धडक

भारताची दिमाखात उपांत्य फेरीत धडक

Next

लंडन : सुरेख गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर विराट कोहली व शिखर धवन यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर विद्यमान चॅम्पियन भारताने रविवारी येथे ब गटातील उपांत्यपूर्व फेरीसारखी असणाऱ्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा तब्बल ७२ चेंडू आणि आठ विकेटने धुव्वा उडवताना दिमाखात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत उपांत्य फेरीत धडक मारली.
भारताने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला ४४.३ षटकांत १९१ धावांत गुंडाळले. त्यानंतर शिखर धवन (७८) आणि विराट कोहली (नाबाद ७६) यांनी दुसऱ्या गड्यासाठी १२८ धावांची भागीदारी केली. त्या जोरावर भारताने ३८ व्या षटकांत २ बाद १९३ धावा करीत हा एकतर्फी सामना जिंकला. युवराजसिंगने षटकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. युवराजसिंग २३ धावांवर नाबाद राहिला.
विजयाचा पाठलाग करताना भारतीय संघ लवकरात लवकर लक्ष्य गाठू इच्छित होते. रोहित शर्मा (१२) याने कॅगिसो रबाडा याचे स्वागत चौकार आणि षटकाराने केले, तर धवनने मोर्ने मॉर्कलच्या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकला. भारताने सहाव्या षटकात पहिला फलंदाज गमावला. त्या वेळेस रोहित शर्मा मॉर्कलच्या चेंडूवर यष्टिरक्षक डिकॉकच्या हाती झेल देऊन बाद झाला. कोहलीला सुरुवातीला धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला. रोहित बाद झाल्याच्या १७ चेंडूंनंतर एकही धाव झाली नाही; परंतु त्यानंतर पहिल्या २४ चेंडूंत फक्त ९ धावा करणाऱ्या कोहलीने फिलकुवायो याला षटकार ठोकला. तो २१ धावांवर असताना अमलाने त्याचा कठीण झेल सोडला. दुसरीकडे धवनने आपला शानदार फार्म कायम ठेवला. त्याने इम्रान ताहीरला दोन चौकार मारले तर कोहलीने मॉर्कलचा समाचार घेत त्याला सुरेख चौकार ठोकताना धावांची गती उंचावली. एकवेळ दोन्ही फलंदाजांच्या धावा बरोबरीने होत्या; परंतु त्यानंतर धवनने आणखी आक्रमक पवित्रा अवलंबला. या डावखुऱ्या फलंदाजाने ख्रिस मॉरीसला चौकार मारत त्याचे अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर त्याचा चेंडू पुन्हा सीमापार धाडला. कोहलीने ७१ चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. ही भागीदारी अखेर ताहीरने गुगलीवर धवनला मिडआॅफवर झेलबाद करीत फोडली. त्यानंतर कोहली आणि युवराजने संघाच्या विजयावर लीलया शिक्कामोर्तब केले.
भारताचा नेट रनरेट खूप चांगला आहे आणि ते ब गटात अव्वल स्थानावर राहणे निश्चित आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत भारत अ गटातील दुसऱ्या स्थानावरील बांगलादेशशी दोन हात करेल. त्याआधी भारताने दक्षिण आफ्रिकेला ४४.३ षटकांत अवघ्या १९१ धावांत गुंडाळले. हाशिम अमला (३५) आणि क्विंटन डिकॉक (५३) यांनी सलामीसाठी ७६ धावांची भागीदारी करताना दक्षिण आफ्रिकेला संथ; परंतु भक्कम सुरुवात करून दिली. हे दोघे तंबूत परतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे पूर्णपणे कोसळला. फाफ डुप्लेसिसने ३६ धावा केल्या; परंतु मधल्या फळीतील दिग्गज फलंदाज अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेने त्यांचे अखेरचे ८ फलंदाज अवघ्या ५१ धावांत गमावले. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी आज चांगली गोलंदाजी केली. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी अनुक्रमे २३ व २८ धावांवर प्रत्येकी २ बळी घेतले.

08 प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची एकवेळ
२९ व्या षटकांत २ बाद १४0 अशी भक्कम स्थिती होती; परंतु त्यांनी त्यांचे अखेरचे ८ फलंदाज अवघ्या ५१ धावांत गमावले.

03भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षकांनी चपळ क्षेत्ररक्षण करत दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार अ‍ॅबी डिव्हिलियर्ससह ३ फलंदाजांना धावबाद केले.

05विद्यमान विजेत्या भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पाचव्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीत उपांत्य फेरीत धडक मारली. त्याचबरोबर त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या विक्रमाची बरोबरी साधली.


धावफलक
दक्षिण आफ्रिका : डिकॉक त्रि. गो. जडेजा ५३, अमला झे. धोनी गो. अश्विन ३५, डुप्लेसिस त्रि. गो. पंड्या ३६, डिव्हिलियर्स धावबाद १६, मिलर धावबाद १, ड्युमिनी नाबाद २0, ख्रिस मॉरीस झे. भुवनेश्वर गो. बुमराह ४, फिलकुवायो पायचीत गो. बुमराह ४, रबाडा झे. धोनी गो. भुवनेश्वर ५, मॉर्कल झे. कोहली गो. भुवनेश्वर 0, ताहीर धावबाद 0, एकूण : ४४.३ षटकांत सर्वबाद १९१.
गडी बाद क्रम : १-७६, २-११६, ३-१४0, ४-१४२, ५-१५७, ६-१६७, ७-१७८, ८-१८४, ९-१८४. गोलंदाजी : भुवनेश्वर ७.३-0-२३-२, बुमराह ८-0-२८-२, अश्विन ९-0-४३-१, पंड्या १0-0-५२-१, जडेजा १0-0-३९-१.

भारत : रोहित शर्मा झे. क्विंटन डिकॉक गो. मॉर्कल १२, शिखर धवन झे. ड्युप्लेसिस गो. इम्रान ताहीर ७८, विराट कोहली नाबाद ७६, युवराजसिंग नाबाद १६, अवांतर : ४, एकूण : ३८ षटकांत २ बाद १९३.
गडी बाद क्रम : १-२३, २-१५१.
गोलंदाजी : कागिसो रबाडा ९-२-३४-९, मोर्ने मॉर्कल ७-१-३८-१,
फिलकुवायो ५-0-२५-0, ख्रिस मॉरीस
८-0-४0-0, इम्रान ताहीर ६-0-३७-१,
जेपी ड्युमिनी ३-0-१७-0.

Web Title: India face the semifinals in the semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.