भारत अंतिम फेरीत
By admin | Published: March 2, 2016 02:58 AM2016-03-02T02:58:23+5:302016-03-02T02:58:23+5:30
गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर विराट कोहली आणि युवराजसिंग यांनी कठीण परिस्थितीत केलेल्या संयमी फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने मंगळवारी आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत
आशिया चषक टी-२० : विराटची अर्धशतकी खेळी; लंकेवर ५ गड्यांनी मात
मिरपूर : गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर विराट कोहली आणि युवराजसिंग यांनी कठीण परिस्थितीत केलेल्या संयमी फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने मंगळवारी आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेला पाच गड्यांनी पराभूत करीत सलग तिसऱ्या विजयासह स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
लंकेने नाणेफेक गमाविल्यानंतर हार्दिक पंड्या (२६ धावांत दोन बळी) आणि जसप्रीत बुमराह (२७ धावांत दोन बळी) यांच्या भेदक माऱ्यापुढे ९ बाद १४२ अशी आव्हानात्मक मजल गाठली. चमारा कपुगेदरा याने सर्वाधिक ३० धावांचे योगदान दिले. तळाच्या स्थानावर आलेल्या मिलिंदा सिरीवर्धना याने १७ चेंडूंत २२ आणि थिसारा परेराने सहा चेंडूंत १७, तसेच नुवान कुलसेकरा याने नऊ चेंडूंत १३ धावा केल्या. भारताची एक वेळ २ बाद १६ अशी पडझड झाली होती. अशा वेळी पाकवरील विजयाचा शिल्पकार ठरलेल्या कोहलीने ४७ चेंडूंत नाबाद ५६ धावा फटकवित संयमी खेळी केली. युवराजने १८ चेंडू खेळून ३५ धावा ठोकल्या. यादरम्यान सिक्सरकिंग युवीने खास शैलीत फटके मारले. धोनीनेही एक षटकार मारून चाहत्यांचे मनोरंजन केले. विजयी चौकार विराटने मारताच १९.२ षटकांत ५ बाद १४२ धावा करीत सामना संपविला. भारताचा यंदा नऊ टी-२० सामन्यांतील हा आठवा विजय होता. दुसरीकडे श्रीलंकेने तीन सामन्यांत हा दुसरा पराभव पत्करला. यामुळे लंकेच्या अंतिम फेरीच्या आशा धूसर झाल्या आहेत.
टी-२० मध्ये धोनीचे यष्टिमागे बळींचे अर्धशतक पूर्ण
मिरपूर : भारतीय कर्णधार व यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टिपाठी बळींचे अर्धशतक पूर्ण केले. धोनीने श्रीलंकेविरुद्ध आशिया कप स्पर्धेत मंगळवारी खेळल्या गेलेल्या लढतीत वेगवान गोलंदाज आशिष नेहराच्या गोलंदाजीत दिनेश चंडीमलचा झेल घेत यष्टिपाठी ५० बळी घेण्याची कामगिरी केली. धोनीने त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर शेहान जयसूर्याचा झेल टिपला. भारतीय कर्णधाराने ६१ व्या लढतीत हा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा यष्टिरक्षक ठरला. पाकिस्तानच्या कामरान अकमलने ५४ सामन्यांत ६० बळी घेतले असून या यादीत तो अव्वल स्थानी आहे.
>> धावफलक
श्रीलंका : दिनेश चंडीमल झे. धोनी गो. नेहरा ०४, तिलकरत्ने दिलशान झे. आश्विन गो. पांड्या १६, शेहान जयसूर्या झे. धोनी गो. बुमराह ०३, चमारा कपुगेदरा झे. पांड्या गो. बुमराह ३०, अॅन्जेलो मॅथ्यूज त्रि. गो. पांड्या १८, मिलिंदा सिरीवर्धना झे. रैना गो. आश्विन २२, दासून शनाका धावबाद ०१, थिसारा परेरा यष्टिचित धोनी गो. आश्विन १७, नुवान कुलसेकरा धावबाद १३, दुश्मंता चमीरा नाबाद २. अवांतर : १०. एकूण : २० षटकांत ९ बाद १३८. गोलंदाजी : आशिष नेहरा ४-०-२३-१, जसप्रीत बुमराह ४-०-२७-२, हार्दिक पांड्या ४-०-२६-२, युवराज सिंग १-०-३-०, रवींद्र जडेजा २-०-१९-०, रविचंद्रन आश्विन ४-०-२६-२, सुरेश रैना १-०-९-०.
भारत : शिखर धवन झे. चंडीमल गो. कुलसेकरा १३, रोहित शर्मा झे. कपुगेदरा गो. कुलसेकरा १५, विराट कोहली नाबाद ५६, सुरेश रैना झे. कुलसेकरा गो. शनाका २५, युवराजसिंग झे. कुलसेकरा गो. परेरा ३५, हार्दिक पंड्या त्रि. गो. हेराथ २, धोनी नाबाद ७, अवांतर : १, एकूण : १९.२ षटकांत ५ बाद १४२ धावा. गोलंदाजी : मॅथ्यूज ३-१६-०-०, कुलसेकरा ३-०-२१-२, परेरा ४-०-३२-१, शमीरा ४-०-२७-०, हेराथ ३.२-०-२६-१, शनाका १-०-७-१, सिरीवर्धने १-०-१३-०.
>> ३ विजयांसह भारत ६ गुणांसह अव्वल स्थानी आहे. बांगलादेश २ विजय व एका पराभवासह
(४ गुण) दुसऱ्या स्थानी आहे.