पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने मिळवले पहिले पदक, मनू भाकरचा कांस्य‘नेम’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 05:19 AM2024-07-29T05:19:59+5:302024-07-29T05:22:10+5:30

ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. 

india first medal at paris olympics 2024 manu bhaker won bronze | पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने मिळवले पहिले पदक, मनू भाकरचा कांस्य‘नेम’

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने मिळवले पहिले पदक, मनू भाकरचा कांस्य‘नेम’

पॅरिस : यंदाच्या ऑलिम्पिकचे सीन नदीद्वारे ऐतिहासिक उद्घाटन झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी भारताच्या पदक खात्याचा श्रीगणेशा झाला. नेमबाज मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. यांसह, ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. 

आठ नेमबाजांच्या अंतिम 

फेरीत मनूने २२१.७ गुणांचा वेध घेत तिसरे स्थान पटकावले. जिन ओह आणि येजी किम या दक्षिण कोरियन नेमबाजांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक पटकावले. जिन ओह हिने ऑलिम्पिक विक्रमाची नोंद करत सुवर्णपदक जिंकले. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनूला फोन करून तिच्या यशाबद्दल अभिनंदन केले. 

२०१२ सालच्या लंडन ऑलिम्पिकनंतर भारताला नेमबाजीत पहिलेच ऑलिम्पिक पदक मिळाले. अभिनव बिंद्रा, राजवर्धनसिंग राठोड, विजय कुमार आणि गगन नारंग यांच्यानंतर मनू ऑलिम्पिक पदक जिंकणारी पाचवी भारतीय ठरली.

अवघ्या ०.१ गुणाने हुकली सुवर्ण लढत : मनूने अंतिम फेरीत तिसरे स्थान मिळवले खरे; मात्र ज्यावेळी ती तिसऱ्या स्थानासह बाहेर पडली, तेव्हा दुसऱ्या स्थानावरील येजी किमच्या तुलनेत मनू अवघ्या ०.१ गुणाने मागे होती. 

टोकियोत पिस्तूल बिघडली आणि...

टोकियो ऑलिम्पिकमध्येही मनू भाकर पदकाची प्रबळ दावेदार होती. मात्र १० मीटर एअर पिस्तूल पात्रता फेरीदरम्यान तिच्या पिस्तुलामध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे तिला नाइलाजाने माघार घ्यावी लागली होती. पॅरिसमध्ये मात्र तिने सर्व कसर भरून काढताना यंदाच्या आपल्या पहिल्याच स्पर्धेत पदक मिळवले.
 

Web Title: india first medal at paris olympics 2024 manu bhaker won bronze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.