आशियाई चॅम्पियन्स हॉकी: भारताचे सुवर्ण स्वप्न भंगले; जपानकडून पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 10:30 AM2021-12-22T10:30:26+5:302021-12-22T10:31:12+5:30
संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या गतविजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाला उपांत्य फेरीत जपानविरुद्ध धक्कादायक पराभव पत्करावा लागला.
ढाका : संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या गतविजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाला उपांत्य फेरीत जपानविरुद्ध ३-५ असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला. यामुळे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी (एसीटी) हॉकी स्पर्धेत भारतीय संघाचे सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. भारताला आता कांस्य पदकासाठी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भिडावे लागेल. अन्य उपांत्य सामन्यात दक्षिण कोरियाने पाकिस्तानला ६-५ असे नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
उपांत्य सामना सुरू होण्याच्या आधीपासूनच भारताला संभाव्य विजेता मानले जात होते. स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात कोरियाविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागल्यानंतर भारताने बांगलादेश, पाकिस्तान आणि जपान यांना नमवत सलग तीन विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थान काबीज केले. अखेरच्या साखळी सामन्यात जपानला ६-० असे मोठ्या अंतराने नमवले असल्याने भारतीयांचा आत्मविश्वासही उंचावलेला होता. मात्र, उपांत्य सामन्यादरम्यान प्रत्यक्ष मैदानात जपानच्या वेगवान खेळापुढे भारतीयांचा निभाव लागला नाही. विशेष म्हणजे जपानविरुद्धचा भारताचा रेकॉर्डही चांगला आहे. मात्र, तरीही जपानने गतविजेत्यांना नमवत स्पर्धेत खळबळ माजवली.