भारताला मालिका विजयाची संधी
By admin | Published: January 29, 2016 03:41 AM2016-01-29T03:41:33+5:302016-01-29T03:41:33+5:30
पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने आॅस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यात विजयासह मालिका जिंकण्याचा निर्धार केला आहे.
मेलबोर्न : पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने आॅस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यात विजयासह मालिका जिंकण्याचा निर्धार केला आहे.
पहिला सामना ३७ धावांनी जिंकून भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दुसरा सामना जिंकल्यास सिडनीत अखेरच्या टी-२० त प्रयोग करण्याची भारताला संधी असेल. कर्णधार धोनीने गुरकिरत मान, रिषी धवन, युवराजसिंग, सुरेश रैना, आर. आश्विन, तसेच जसप्रीत बुमराह या सर्वांना संधी दिली. फलंदाजी क्रमही निश्चित आहे. अजिंक्य रहाणे मात्र फिट झालेला नाही. त्याने काल हलका सराव केला, पण त्याला खेळविण्याची जोखीम पत्करण्याची धोनीची इच्छा नाही.
अॅडिलेडच्या विजयानंतर धोनीने आणखी काही समस्या सुटायच्या आहेत, असे म्हटले होते; पण त्या कशा सोडविल्या जातील, हे सांगितले नव्हते. मागच्या सामन्यात खेळलेला संघ येथे कायम राहील व युवी, तसेच रैनावर अधिक फोकस असेल. रैनाने अॅडिलेडमध्ये ३४ चेंडूंत ४१ धावा केल्या होत्या. धोनी टी-२० सामन्यांत डावे-उजवे संयोजन पसंत करतो. रैनाला मागच्या सामन्यात संधी मिळाली, तर आता युवीला फलंदाजीसाठी आधी पाठविले जाऊ शकते. दरम्यान, आॅस्ट्रेलियावर यंदाच्या सत्रात प्रथमच दडपण आले आहे. या मालिकेआधी न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीजला आॅस्ट्रेलियाने दोन्ही प्रकारांत सहजपणे नमविले. भारतालादेखील वन डे मालिकेत धूळ चारली, पण काही सामन्यांचे निकाल फारच चुरशीचे ठरले. वन डेत पाच विश्वचषक विजेत्या आॅस्ट्रेलियाचा टी-२० तील रेकॉर्ड मात्र फारच साधारण आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या समावेशाने संघ भक्कम झाला असला, तरी कर्णधार अॅरोन फिंच याला बऱ्याच आघाड्यांवर सुधारणा करावी लागणार आहे. (वृत्तसंस्था)
हार्दिक पंड्याला फटकारले
भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने पहिल्या टी-२० सामन्यात आॅस्ट्रेलियावरील विजयाचा आनंद आक्रमकरीत्या साजरा केल्याप्रकरणी आयसीसीने त्याची कानउघाडणी केली आहे.
ही घटना आॅस्ट्रेलियाच्या डावात १६ व्या षटकांत घडली. ख्रिस लेन याला बाद करताच पंड्याने आक्रमकरीत्या आनंद साजरा केला होता. पंड्याने स्वत:ची चूक मान्य केल्याने आयसीसी मॅचरेफ्री जेफ क्रो यांनी पुढील कारवाई टाळली.
टी-२० खेळणे आव्हानात्मक
कसोटी आणि वन डेत आम्ही राजे आहोत; पण टी-२० आव्हानात्मक आहे. कारण हा प्रकार मनोरंजनात्मक आहे. या प्रकारातील विश्वचषक किंवा रँकिंग ही मोठी बाब नाही. हा प्रकार मनोरंजनाच्या चष्म्यातूनच बघितला जातो. आॅस्ट्रेलियाचे खेळाडू टी-२० मध्ये सातत्याने सोबत खेळत नसल्याने संयोजन बनविणे कठीण जाते. यामुळेच टी-२० आमच्यासाठी आव्हानात्मक बाब आहे.
- शेन वॉटसन, अष्टपैलू खेळाडू आॅस्ट्रेलिया
माझ्याकडे विकेट घेण्याचे लायसेन्स
बळी घेण्याची ताकद असल्याने मी आॅसीविरुद्ध विचलित नाही. ही मालिका फलंदाजांची ठरली. तरीही मी बेसिक्सवर कायम राहिलो. आॅसीकडे धावा काढण्याचे लायसेन्स असेल तर माझ्याकडे गडी बाद करण्याचे लायसेन्स आहे. मी मेहनतीच्या बळावर सरस कामगिरीचे प्रामाणिक प्रयत्न करतो.- आर. आश्विन
संघ यातून निवडणार
भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, युवराजसिंग, सुरेश रैना, हार्दिक पंड्या, गुरकिरत मान, रिषी धवन, रवींंद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, हरभजनसिंग, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, उमेश यादव व अजिंक्य रहाणे.
आॅस्ट्रेलिया : अॅरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, शान मार्श, क्रिस लिन, जेम्स फाकनेर, मॅथ्यू वेड, नाथन लियॉन, कॅमरून बायस, ट्रेव्हिस हेड, जॉन हेस्टिंग्स, स्कॉट बोलॅन्ड, केन रिचडर््सन,अॅन्ड्र्यू टाये, शान टैट व शेन वाट्सन.