भारताला मालिका विजयाची संधी

By admin | Published: July 2, 2017 12:24 AM2017-07-02T00:24:52+5:302017-07-02T00:24:52+5:30

सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आत्मविश्वासाचा संचार झालेल्या भारतीय संघाला वेस्ट इंडिज दौऱ्यात आज रविवारी चौथा वन डे जिंकून पाच सामन्यांची

India has a chance to win the series | भारताला मालिका विजयाची संधी

भारताला मालिका विजयाची संधी

Next

 अँटिग्वॉ : सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आत्मविश्वासाचा संचार झालेल्या भारतीय संघाला वेस्ट इंडिज दौऱ्यात आज रविवारी चौथा वन डे जिंकून पाच सामन्यांची मालिका जिंकण्याची संधी असेल.
पहिला वन डे पावसात वाहून गेल्यानंतर, दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात भारताने क्रमश: १०५, तसेच ९३ धावांनी आकर्षक विजय मिळवीत २-० अशी आघाडी घेतली. विंडीज संघ कामगिरी करण्यात अपयशी तर ठरलाच, पण आतापर्यंत संघर्ष करताना दिसत आहे. या संघाची वाटचाल पाहता कोहली अ‍ॅन्ड कंपनीला मालिकेत ४-० ने विजय मिळाला तर आश्चर्य वाटू नये.
भारताने विंडीज दौऱ्यात सर्वच आघाड्यांवर यशस्वी कमागिरी केली आहे. फलंदाजांनी धावा काढल्या, तर गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करीत प्रतिस्पर्धी फलंदाजांना जाळ्यात ओढले. अजिंक्य रहाणे याने ६२, १०३ आणि ७२ धावा ठोकून संधीचा पुरेपूर लाभ घेतला आहे. शिखर धवन तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरला असला, तरी त्याने प्रभावित केले. तिसऱ्या लढतीत मधल्या फळीलादेखील प्रतिभा दाखविण्याची संधी मिळाली.
धवन आणि कोहली लवकर बाद झाल्यानंतर धोनीने ७८ धावांची नाबाद खेळी करीत डाव सावरला. युवराजच्या ३९ धावा त्याचा आत्मविश्वास उंचाविणाऱ्या ठरल्या. केदारनेदेखील २६ चेंडूंत नाबाद ४० धावा ठोकून झटपट फटकेबाजीची क्षमता सिद्ध केली. दुसरीकडे जेसन होल्डरच्या नेतृत्वाखालील यजमान संघाला फलंदाजी आणि गोलंदाजीत भारतावर वरचढ होण्याचे डावपेच कळले नसावेत. युवा खेळाडूंचा संघात भरणा आहे. पण अनुभवात खेळाडू फार कमी पडतात, असे चित्र पाहायला मिळाले. चौथ्या सामन्यात कोहली अंतिम एकादशमध्ये बदल करतो का, हे पाहणे रंजक ठरेल. बदल झाल्यास दिनेश कार्तिक, रिषभ पंत आणि मोहम्मद शमी यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)


उभय संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, युवराज सिंग, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, कुलदीप यादव, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, मोहंमद शमी आणि रवींद्र जडेजा.
वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), सुनील अंबरिश, देवेंद्र बिशू, रोस्टन चेज, मिगुएल कमिन्स, केली होप, शाय होप, अल्जारी जोसेफ, एविन लुईस, जेसन मोहम्मद, अ‍ॅश्ले नर्स, रोवमॅन पॉवेल आणि केसरिक विलियम्स.


काही बदल शक्य : कोहली

विंडीजविरुद्ध सध्याच्या मालिकेत आतापर्यंत खेळण्याची संधी न मिळालेल्या खेळाडूंना संधी देण्याच्या इराद्याने काही बदल शक्य असल्याचे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले. रिषभ पंत, मोहम्मद शमी आणि दिनेश कार्तिक हे आतापर्यंत राखीव बाकावर बसून आहेत. या सर्वांचा चौथ्या सामन्यासाठी विचार होऊ शकतो.


मी जुन्या मद्यासारखा - धोनी : मद्य जितके जुने (ओल्ड वाईन) असेल तितके ते चविष्ट आणि महागडे असते. अशा मद्याची किंमतही अधिक असते. फलंदाजीतील माझा फॉर्मही असाच आहे. मी तर जुन्या मद्यासारखा असल्याची प्रतिक्रिया महेंद्रसिंग धोनी याने सामन्यानंतर व्यक्त केली. वाढत्या वयासोबत फलंदाजी अधिक उत्कृष्ट होत असल्याकडे लक्ष वेधताच धोनी म्हणाला, ‘माझ्या यशाचे तंत्र मद्यासारखे आहे. कठीण खेळपट्टीवर धावा काढल्याचे समाधान त्याच्या शब्दात होते. दीड वर्षांपासून आघाडीचे फलंदाज धावा काढत आहेत. संधी मिळणे आणि धावा काढणे हा योगायोग आहे.
२५० धावा फळ्यावर लावणे माझे टार्गेट होते. केदारच्या सोबतीने त्यात यशस्वी ठरलो.


झटपट क्रिकेटमधील स्वत:च्या क्षमतेवर अटळ
राहिलो

मर्यादित षटकांच्या सामन्यात मला उशिरा संधी मिळाली. झटपट धावा काढण्याबाबत माझ्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याने वन डे क्रिकेटसाठी प्रतीक्षेत असताना स्वत:च्या क्षमतेवरील विश्वास मात्र कायम राखल्याचे मत अजिंक्य रहाणेने व्यक्त केले आहे. विंडीज दौऱ्यात रोहितच्या अनुपस्थितीत तिन्ही सामन्यात डावाचा प्रारंभ करणाऱ्या अजिंक्यने ६२, १०३ आणि ७२ धावांची दमदार खेळी केली. वन डे सामन्यात अंतिम एकादशमधून वगळल्याबद्दल खेद वाटायचा का, असे विचारताच रहाणे म्हणाला, ‘ माझा विश्वास ढळला नव्हता. चांगल्या आणि सातत्यपपूर्ण धावा काढण्यासाठी मी केवळ संधीच्या शोधात होतो.’

मला सलामीला पाठविल्याबद्दल कोहली आणि व्यवस्थापनाचे आभार मानतो.’
सावध सुरुवातीनंतर वेगवान धावा काढण्यात अडसर येतो का, असे विचारताच तो म्हणाला,‘ सुरुवातीला थोडा वेळ लागतो पण परिस्थिती नियंत्रणात येताच सहजपणे वेगवान फटकेबाजी करू शकतो.’ खेळपट्टीचे स्वरूप पाहून फटकेबाजी करण्याचा निर्णय घ्यावा लागतो, असे अजिंक्यचे मत आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: India has a chance to win the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.