भारताला ‘टॉप’वर येण्याची संधी
By Admin | Published: August 16, 2016 12:34 AM2016-08-16T00:34:33+5:302016-08-16T00:34:33+5:30
वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेल्या टीम इंडियाकडे चौथा आणि अखेरचा सामना जिंकून आयसीसी कसोटी क्रमवारीत
दुबई : वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेल्या टीम इंडियाकडे चौथा आणि अखेरचा सामना जिंकून आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची सुवर्णसंधी आहे.
भारतीय संघ जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या आॅस्टे्रलियानंतर एका स्थानाने खाली असून टीम इंडियाने विंडिजविरुद्ध तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. १८ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या चौथ्या सामन्यातही बाजी मारली, तर आॅस्टे्रलियाला पिछाडीवर टाकून टीम इंडिया अव्वल स्थानी विराजमान होईल. दुसरीकडे इंग्लंडविरुद्ध अंतिम कसोटी सामना जिंकणाऱ्या पाकिस्तानही क्रमवारीत अव्वल येण्याची शक्यता आहे. मात्र हे सर्व काही श्रीलंका-आॅस्टे्रलिया आणि वेस्ट इंडिज-भारत मालिकेतील निर्णयावर अवलंबून आहे.
इंग्लंड व पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. जर श्रीलंकाने आॅस्टे्रलियाला २-० असे नमवण्यात यश मिळवले तर पाकिस्तान आॅस्टे्रलियाला पिछाडीवर टाकण्यात यशस्वी होईल. तसेच आपले अव्वल स्थान कायम राखण्यासाठी आॅस्टे्रलियाला कोलंबो कसोटीत श्रीलंकेला नमवावे लागेल. त्याचबरोबर त्यांना विंडिज आपला अखेरचा कसोटी सामना भारताविरुद्ध जिंकेल किंवा अनिर्णित राखेल यासाठीही प्रार्थना करावी लागेल.