भारताने पाकला लोळवले

By admin | Published: February 28, 2016 01:11 AM2016-02-28T01:11:05+5:302016-02-28T01:11:05+5:30

भारतीय संघाने आशिया चषक टी-२० च्या महासंग्रामात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला शनिवारी पाच गडी राखून सहज लोळवले. हार्दिक पंड्याच्या भेदक माऱ्यापाठोपाठ आक्रमकतेसाठी

India has rolled it | भारताने पाकला लोळवले

भारताने पाकला लोळवले

Next

मीरपूर : भारतीय संघाने आशिया चषक टी-२० च्या महासंग्रामात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला शनिवारी पाच गडी राखून सहज लोळवले. हार्दिक पंड्याच्या भेदक माऱ्यापाठोपाठ आक्रमकतेसाठी प्रख्यात असलेल्या विराट कोहलीच्या ४९ धावांमुळे भारताने विजयी जल्लोष केला, तर पाकमध्ये पराभवाची शोककळा पसरली. भारतीय संघाचा स्पर्धेतील हा दुसरा विजय असून, गुणतालिकेत ते ४ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहेत.
पंड्याच्या नेतृत्वात गोलंदाजांनी पाकिस्तानचा १७.३ षटकांत ८३ धावांत खुर्दा उडविल्यानंतर लहान धावसंख्येचा पाठलाग करताना, भारताचीही सुरुवातीला दमछाक झाली. डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमेर याने पहिल्या दोन षटकांत तीन गडी बाद करीत सनसनाटी निर्माण केली होती. भारताने तीन गडी अवघ्या आठ धावांत गमविल्यानंतर कठीण स्थितीत विराटने युवराजसिंगसोबत खेळाची सूत्रे स्वत:कडे घेतली. चौथ्या गड्यासाठी या दोघांनी ११.३ षटकांत ६८ धावांची भागीदारी करीत पाकच्या तोंडचे पाणी पळविले. विराट अर्धशतकापासून एका धावेने वंचित राहिला, पण तोवर भारताने विजयी पथावर मार्गक्रमण केले होते. विराट बाद होताच दुसऱ्याच चेंडूवर हार्दिक पंड्यादेखील खाते न उघडताच बाद झाल्याने पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली. पण लक्ष्य लहान असल्याने भारताने १५.३ षटकांत ५ बाद ८५ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
विराटने दोन वर्षांपृूर्वी विश्वचषकात बांगलादेशात पाकविरुद्ध ३६ धावांची खेळी केली होती. त्या वेळी भारत ७ गड्यांनी जिंकला. आजही त्याने जिगरबाज खेळी केली. युवराज सुरुवातीला अडखळला; पण विराटच्या सोबतीने तो खेळपट्टीवर उभा होता. युवराजने दोन चौकारांसह ३२ चेंडूंत नाबाद १४ धावांचे योगदान दिले. कर्णधार धोनीने विजयी चौकारासह सात धावा केल्या. आमेरची चार षटके संपताच भारतावरील दडपण नाहीसे झाले. त्याने पहिल्याच षटकात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांना भोपळा न फोडू देताच पायचीत केले. त्यानंतर सुरेश रैनाला (१) वहाब रियाझकडे झेल देण्यास भाग पाडले. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदीचा सामना केल्यानंतर मैदानावर आलेल्या आमेरने पाकच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या; पण विराटच्या पराक्रमी फलंदाजीने त्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. धोनीने युवराजसोबत भारताचा विजय प्रशस्त केला. धोनीने चौकार मारताच २७ चेंडू आधीच सामना संपला. (वृत्तसंस्था)

१२८ पाकिस्तानची भारताविरुद्धची टी-२० मधील नीचांकी धावसंख्या. २०१२ सप्टेंबरमध्ये कोलंबो येथे झालेल्या लढतीत पाकिस्तानचा डाव १२८ धावांत संपुष्टात आला. या सामन्यात कोहलीने नाबाद ७८ धावांची खेळी केली होती. भारताने हा सामना १७व्या षटकांतच जिंकला.
८२ एप्रिल २०१४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पाकिस्तान संघाची ८२ ही नीचांकी धावसंख्या होती.
७४ सप्टेंबर २०१२ मध्ये आॅस्ट्रेलिया दुबई येथे झालेल्या लढतीत पाकिस्तानचा डाव ७४ धावांत संपुष्टात आला.

धावफलक
पाकिस्तान : मोहम्मद हफिज झे. धोनी गो. नेहरा ४, शरजील खान झे. रहाणे गो. बुमराह ७, मंझृूर धावबाद(कोहली) १०, शोएब मलिक झे. धोनी गो. पंड्या ४, उमर अकमल पायचित गो. युवराजसिंग ३, सर्शराज अहमद त्रि. गो. जडेजा २५, शाहीद आफ्रिदी धावबाद(जडेजा/धोनी) २, वहाब रियाझ पायचित गो. जडेजा ४, मोहम्मद सामी झे. रैना गो. पंड्या ८, मोहम्मद आमेर त्रि. गो. पंड्या १, मोहम्मद इरफान नाबाद ००, अवांतर १५, एकूण: १७.३ षटकांत सर्वबाद ८३ धावा. गोलंदाजी : आशिष नेहरा ३-०-२०-१, बुमराह ३-२-८-१, हार्दिक पंड्या ३.३-०-८-३, युवराजसिंग २-०-११-१, रवींद्र जडेजा ३-०-११-२, रवीचंद्रन अश्विन ३-०-२१-०
भारत : रोहित शर्मा पायचीत गो. मोहम्मद आमेर ००, अजिंक्य रहाणे पायचीत गो. आमेर ००, विराट कोहली पायचीत गो. मोहम्मद सामी ४९, सुरेश रैना झे. वहाब रियाझ गो. मो. आमेर १, युवराजसिंग नाबाद १४, हार्दिक पंड्या झे. हफिज गो. मोहम्मद सामी ००, धोनी नाबाद ७, अवांतर :१४, एकूण: १५.३ षटकांत ५ बाद ८५; गोलंदाजी : मो. आमेर ४-०-१८-३, मो. सामी ४-०-१६-२, मोहम्मद इरफान ४-०-१६-०, वहाब रियाझ ३.३-०-३१-०.

Web Title: India has rolled it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.