भारताने कोरियाला बरोबरीत रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:11 AM2018-05-20T00:11:46+5:302018-05-20T00:11:46+5:30
महिला हॉकी : अंतिम लढतीपूर्वीचा सामना १-१ ने ड्रॉ
डोंघायसिटी (द. कोरिया) : आक्रमक फळीतील युवा खेळाडू लालरेमसियामी हिने नोंदविलेल्या गोलमुळे गत चॅम्पियन भारताने शनिवारी पाचव्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी महिला हॉकीच्या अखेरच्या साखळी सामन्यात कोरियाला १-१ असे बरोबरीत रोखले. दोन्ही संघ उद्या (रविवारी) अंतिम सामन्यात पुन्हा आमने-सामने येणार आहेत.
सुनीता लाक्राच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गुणतालिकेत अद्याप अव्वल स्थानावर कायम आहे. भारताने जपानवर ४-१, चीनवर ३-१ आणि मलेशियावर ३-२ असा विजय नोंदविला होता. विश्व क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या कोरियाने आक्रमक खेळाने सुरुवात केली खरी; मात्र भारताने चौथ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळविला. ड्रॅगफ्लिकर गुरजित कौरने मारलेला फ्लिक शॉट कोरियाच्या गोलकीपरने थोपवून लावला. यानंतरही भारताने कोरियाच्या बचाव फळीवर वारंवार हल्ले चढविले; पण ऐनवेळी केलेल्या चुकांमुळे गोल नोंदविण्यात यश आले नाही.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये कोरियाकडून सेयूल की चियोन हिने भारतीय गोलकीपर सविताला चकवित ड्रॅग फ्लिकद्वारे शानदार गोल केला. तिसºया क्वार्टरमध्ये गोल होऊ शकला नाही. चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला कोरियाच्या खेळाडूंना पेनल्टी कॉर्नरच्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. पण भारताला पेनल्टी कॉर्नर मिळताच लालरेमसियामीने गोल नोंदवित सामन्यात बरोबरी साधून दिली. ५४व्या मिनिटाला कोरियाला पुन्हा गोल नोंदविण्याची संधी मिळाली होती; पण भारतीय गोलकीपरने ती हाणून पाडली. (वृत्तसंस्था)