भारताचे दोन सराव सामने
By admin | Published: January 8, 2016 03:35 AM2016-01-08T03:35:58+5:302016-01-08T03:35:58+5:30
भारतीय संघ आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे सामन्यांच्या मालिकेपूर्वी शुक्रवारी आणि शनिवारी वाका मैदानावर पश्चिम आॅस्ट्रेलिया इलेव्हनविरुद्ध दोन सराव सामने खेळणार आहे.
पर्थ : भारतीय संघ आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे सामन्यांच्या मालिकेपूर्वी शुक्रवारी आणि शनिवारी वाका मैदानावर पश्चिम आॅस्ट्रेलिया इलेव्हनविरुद्ध दोन सराव सामने खेळणार आहे.
शुक्रवारी खेळली जाणारी लढत टी-२० राहणार असून, शनिवारी दुसरी लढत ५० षटकांची होईल. सराव सामन्यात सहभागी होणारा पश्चिम आॅस्ट्रेलियाचा मुख्य संघ राहणार नाही. कारण, त्यांचा मुख्य संघ पर्थ स्कोरचर्सच्या नावाने बिग बॅश लीगमध्ये खेळत आहे. त्यांचे खेळाडू सराव सामन्यासाठी उपलब्ध राहणार नाहीत. त्यामुळे पश्चिम आॅस्ट्रेलियाचा दुय्यम दर्जाचा संघ सराव सामन्यात सहभागी होईल.
भारत-आॅस्ट्रेलियादरम्यानच्या ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत १२ जानेवारी रोजी खेळली जाणार आहे. वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ आॅस्ट्रेलियात डेरेदाखल झाला आहे, तर टी-२० स्पेशालिस्ट युवराज सिंह, हरभजन सिंग व आशिष नेहरा हे खेळाडू वन-डे मालिका संपल्यानंतर संघात सामील होतील.
दोन सराव सामन्यांच्या निमित्ताने कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि संघ संचालक रवी शास्त्री यांना संभाव्य ११ खेळाडू निश्चित करण्यासाठी मदत मिळेल. सराव सामन्याला अधिकृत दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे यात सर्व खेळाडूंना सहभागी होण्याची संधी आहे. कर्णधार धोनीसाठी सध्या सुरेश रैनाच्या स्थानी कुणाला संधी द्यायची, हा प्रश्न ऐरणीवर आहे. मनीष पांडे आणि गुरकिरत मान यांच्यापैकी एकाला या स्थानी संधी मिळण्याची शक्यता आहे. मनीष पांडेने आतापर्यंत झिम्बाब्वेविरुद्ध एकमेव वन-डे सामना खेळलेला आहे. त्यात त्याने ७१ धावांची खेळी केली होती, तर गुरकिरतने अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नाही. गुरकिरत चांगला आॅफ ब्रेक गोलंदाज आहे. जर धोनी स्पेशालिस्ट फिरकीपटू म्हणून केवळ रविचंद्रन अश्विनला खेळवणार असेल, तर गुरकिरत दुसरा फिरकीपटू म्हणून पर्याय ठरू शकतो. (वृत्तसंस्था)