भारत कसोटीत भक्कम स्थितीत, ऑस्ट्रेलियावर 152 धावांची आघाडी
By Admin | Published: March 19, 2017 05:17 PM2017-03-19T17:17:05+5:302017-03-19T17:33:19+5:30
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला रांचीमधल्या तिस-या कसोटी सामन्याचा चौथा दिवस रंगतदार ठरला आहे.
ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 19 - भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला रांचीमधल्या तिस-या कसोटी सामन्याचा चौथा दिवस रंगतदार ठरला आहे. टीम इंडियानं आपला पहिला डाव 9 गड्यांच्या मोबदल्यात 603 धावांवर घोषित केला आहे. विशेष म्हणजे कसोटीत भारताकडे ऑस्ट्रेलियाविरोधात 152 धावांची आघाडी आहे. रवींद्र जाडेजानं डेव्हिड वॉर्नर आणि नॅथन लायनचा बाद करत चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाला 2 बाद 23 धावांवर रोखले आहे. भारताकडे अद्यापही 129 धावांची आघाडी आहे. त्यामुळेच कसोटीत टीम इंडियाला विजयाची आशा आहे.
टीम इंडियाला रांची कसोटीत ख-या अर्थानं पुजारा आणि साहा यांनी सातव्या विकेटसाठी केलेल्या 199 धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियावर वर्चस्व प्रस्थापित करणं सहजशक्य झालं आहे. चेतेश्वर पुजारानं केलेलं द्विशतक, त्याचबरोबर रिद्धिमान साहाचं शतक आणि रवींद्र जाडेजाचं नाबाद अर्धशतक यांच्या जोरावर टीम इंडियानं रांची कसोटीत 9 बाद 603 या धावांपर्यंत मजल मारत पहिला डाव घोषित केला होता. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 152 धावांची आघाडी मिळाली होती.
पुजारानं 505 चेंडूंत 21 चौकारांसह 202 धावांची खेळी केली. रिद्धिमान साहानं आठ चौकार आणि एका षटकार लगावत 117 धावा करत भारताच्या धावसंख्येत भर घातली. त्यानंतर मैदानावर आलेल्या रवींद्र जाडेजानं पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 54 धावा ठोकून टीम इंडियाला दिशा मिळवून दिली. पुजारा आणि साहा यांनी सातव्या विकेटसाठी रचलेल्या 199 धावांच्या भागीदारीनं टीम इंडिया भक्कम स्थितीत पोहोचली. रांची कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतानं ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. चेतेश्वर पुजारा आणि रिद्धिमान साहाच्या भक्कम भागीदारीच्या जोरावर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियावर सहजरीत्या आघाडी मिळवली. मात्र रिद्धिमान साहाला पंचांनी बाद केले असतानाच उफर वापरल्यामुळे साहाला अखेर जीवदान मिळालं. यामुळे ऑस्ट्रेलियनं संघात कमालीची नाराजी पसरली होती.