विश्वचषक पुरुष हॉकी स्पर्धेचे यजमानपद भारताकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 02:13 AM2019-11-09T02:13:42+5:302019-11-09T02:14:03+5:30
२०२३ साली रंगणार स्पर्धा : चौथ्यांदा स्पर्धेचे आयोजन करणारा पहिला देश
लुसाने : आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) शुक्रवारी २०२३ पुरुष हॉकी विश्वकचषक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताची निवड केली. भारतात सलग दुसऱ्या या स्पर्धेचे आयोजन होणार असून एकूण चौथ्यांदा भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषविणार आहे. विशेष म्हणजे असा मान मिळवणारा भारत पहिला देश ठरला.
एफआयएचच्या मते पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा भारतात १३ ते २९ जानेवारी या कालावधीत खेळली जाईल. एफआयएचची वर्षातील अखेरची बैठक शुक्रवारी झाली. त्यांच्या कार्यकारी बोर्डाने हा निर्णय घेतला. याच बैठकीत निर्णय घेण्यात आला की स्पेन व नेदरलँड १ ते २२ जुलै या कालावधीत आयोजित २०२२ महिला विश्वचषक स्पर्धेचे सहयजमान राहतील. पुरुष आणि महिला या दोन्ही विश्वचषक स्पर्धेत स्थळांची घोषणा नंतर यजमान देशांतर्फे करण्यात येईल. या निर्णयामुळे भारत पुरुषांच्या चारवेळा विश्वचषक स्पर्धांचे आयोजन करणारा पहिला देश ठरणार आहे. यापूर्वी भारतात १९८२ मध्ये मुंबई, २०१० मध्ये नवी दिल्ली आणि २०१८ मध्ये भुवनेश्वर येथे विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नेदरलँडने पुरुषांच्या तीन विश्वचषक स्पर्धांचे यजमानपद भूषविले आहे.
भारत २०२३ मध्ये स्वातंत्र्याचे ७५ वर्ष पूर्ण करणार आहे. त्यामुळे हॉकी इंडिया भारतात या खेळाचा विकास दाखविण्यासाठी विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषविण्यास उत्सुक आहे. पुरुष विश्वचषक स्पर्धेच्या पुढील स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारतासह तीन देशांनी (बेल्जियम व मलेशिया) यांनी दावेदारी सादर केली होती. महिला विश्वचषक स्पर्धेसाठी पाच देशांनी जर्मनी, स्पेन, नेदरलँड, मलेशिया आणि न्यूझीलंड यांनी बोली लावली होती. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचे स्वरुप गेल्या स्पर्धेप्रमाणेच राहील. एफआयएचचे मुख्य कार्यकारी अधिकारी थिएरी वेल म्हणाले की, ‘खेळाच्या विकासा व्यतिरिक्त स्पर्धेतून मिळणाºया लाभाचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला. एफआयएचला या प्रतिष्ठेच्या स्पर्धांच्या यजमानपदासाठी शानदार बोली मिळाली होती. निर्णय घेणे कठीण होते. एफआयएचचे मुख्य लक्ष्य खेळाचा जगभर विकास करण्याचे आहे.’
विश्वचषक स्पर्धेव्यतिरिक्त भारतात अलीकडच्या कालावधीत काही मोठ्या स्पर्धांचे आयोजन झाले आहे. त्यात २०१४ मध्ये एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१६ मध्ये ज्युनिअर पुरुष विश्वचषक, २०१७ मध्ये एफआयएच हॉकी विश्व लीग फायनल, २०१९ मध्ये एफआयएच पुरुष सिरिज फायनल्स आदींचा समावेश असून अलीकडेच एफआयएच हॉकी आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेचा समारोप झाला आहे.
हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद म्हणाले,‘२०२३ च्या पुरुष हॉकी विश्वकप स्पर्धेच्या यजमानपदाची बोली जिंकण्यात यशस्वी ठरल्यामुळे खूश आहे. ज्यावेळी आम्ही दावेदारी सादर केली होती त्योवेळी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यला ७५ वर्षे पूर्ण होणार असल्याचा आनंद साजरा करण्याचे कारण होते. १९७५ मध्ये भारताने विश्वचषक स्पर्धेत अखेरचे जेतेपद पटकावले आहे.’
‘हॉकी खेळाच्या विकासासाठी निश्चितच गुंतवणूकीची गरज आहे. त्यामुळे यजमानपदाच्या प्रत्येक बोलीमधून मिळणाºया लाभाने निर्णय घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली,’ असे एफआयएचचे मुख्य कार्यकारी अधिकारी थिएरी वेल म्हणाले.