भारताला पहिल्या डावात आघाडी
By admin | Published: February 24, 2017 01:16 AM2017-02-24T01:16:30+5:302017-02-24T01:16:30+5:30
सौरभ सिंगचे शतक, तसेच डॅरिल फेरारिओ व सिद्धार्थ आकरेच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय
नागपूर : सौरभ सिंगचे शतक, तसेच डॅरिल फेरारिओ व सिद्धार्थ आकरेच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने ९ बाद ३८८ धावांवर डाव घोषित करीत इंग्लंडविरुद्ध १९ वर्षांखालील युवा संघाच्या दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात १३ धावांची आघाडी घेतली.
इंग्लंडने दुसऱ्या डावात निराशाजनक सुरुवातीनंतर दिवसअखेर २ बाद ३४ धावा केल्या आहेत. डॅनियल हॉटन व जॉर्ज बार्टलेट हे खाते न उघडता नाबाद आहेत.
जामठा येथील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर भारताने ३ बाद १५३ धावांवरून तिसऱ्या दिवशी खेळ सुरू केला. डॅरिल फेरारिओ व सौरभ सिंग यांनी उपाहारापर्यंत २३८ पर्यंत डाव खेचला. उपाहारानंतर फेरारिओ ५५ धावांवर (७७ चेंडू, ७ चौकार) त्रिफळाबाद झाला. सिंगने २६६ चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. सिद्धार्थ आकरेने ५४ (९२ चेंडू, ७ चौकार) धावांचे योगदान दिले. पहिल्या डावात १३ धावांची आघाडी घेतल्यानंतर ९ बाद ३८८ धावांवर डाव घोषित केला. अनुकूल रॉय १७ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडच्या आरोन बिअर्ड, लियान व्हाईट, इआॅन वूड्स, मॅक्स होल्डनने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. मॅक्स होल्ड (१३), हॅरी ब्रुक्स (१६) हे लवकर बाद झाले. (क्रीडा प्रतिनिधी)
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : सर्व बाद ३७५.
भारत : १२०.१ षटकांत ९ बाद ३८८ डाव घोषित.
इंग्लंड (दुसरा डाव) : हॅरी ब्रुक झे. त्यागी गो. फेरारिओ १६, मॅक्स होल्डन त्रि. गो. त्यागी १३, डॅनियल हॉटन खेळत आहे ०, जॉर्ज बार्टलेट खेळत आहे ०. अवांतर : ५, एकूण : ९ षटकांत २ बाद ३४. गडी बाद होण्याचा क्रम : १-३०, २-३४. गोलंदाजी : कनिष सेठ ३-०-१२-०, ऋषभ भगत २-०-९-०, डॅरिल फेरारिओ २-०-८-१, हर्ष त्यागी १-०-१-१.