Big Breaking! भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनाने निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 12:38 AM2021-06-19T00:38:55+5:302021-06-19T00:40:00+5:30
milkha singh: भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते.
चंदीगड: भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. फ्लाइंग सिख म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंग यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात करून ते घरीही परतले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा प्रकृती बिघडल्याने मिल्खा सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिल्खा सिंग यांचे कोरोनावरील उपचारादरम्यान निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. मिल्खा सिंग यांच्या निधनाने एक उत्कृष्ट खेळाडू गमावला, या शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. (india legends milkha singh passes away due to corona)
चंदिगड येथील पीजीआयच्या कोविड रुग्णालयात मिल्खा सिंग यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, शुक्रवारी सायंकाळी अचानक त्यांच्या प्रकृती खालावली आणि ११.३० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. मिल्खा सिंग यांची पत्नी निर्मल सिंग यांचे ५ दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते.
Former Indian Sprinter Milkha Singh, widely regarded as Flying Sikh, passed way last night ( June 18) at 11:30 pm.
— ANI (@ANI) June 18, 2021
He was admitted to ICU on June 3 due to dipping O2 level. On May 20, he had tested positive for COVID19. pic.twitter.com/SYHitglGkJ
पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या निधनावर पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. एक महान खेळाडू आपण गमावला आहे. असंख्य भारतीयांच्या मनात त्यांचे विशेष स्थान होते. ते एक प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व होते. लाखो लोकांना त्यांनी प्रेरणा दिली होती. त्यांच्या जाण्याने झालेली हानी कधीही भरून काढता येणार नाही. अलीकडेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला त्यांना फोन केला होता. ते बोलणे अखेरचे ठरले, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
In the passing away of Shri Milkha Singh Ji, we have lost a colossal sportsperson, who captured the nation’s imagination and had a special place in the hearts of countless Indians. His inspiring personality endeared himself to millions. Anguished by his passing away. pic.twitter.com/h99RNbXI28
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2021
अचानक मिल्खा सिंग यांची तब्येत बिघडली
२० मे रोजी मिल्खा सिंग यांना कोरोना झाला होता. यानंतर काही दिवसांनी त्यांनी कोरोनावर मात केल्याचे सांगण्यात आले. कोरोनावर मात केल्यानंतर मिल्खा सिंग ऑक्सिजन सपोर्टवर होते. सिंग यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, अचानक पुन्हा मिल्खा सिंग यांची तब्येत बिघडली आणि ऑक्सिजन लेव्हल अचानक कमी झाल्याने त्यांना चंदिगड येथील पीजीआयच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
निर्मल मिल्खा सिंग यांचे निधन
मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे ५ दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्या ८५ वर्षांच्या होत्या. निर्मल मिल्खा सिंग यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. मोहाली येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिल्खा सिंग यांनी जिंकून दिले होते. भारताचा पद्मश्री हा किताब देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मिल्खा सिंग यांनी आशियाई स्पर्धेत पाच सुवर्णपदक जिंकली होती. १९६०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत ४०० मीटर शर्यतीच्या फायनलमध्ये ते चौथ्या स्थानावर आले होते. क्रीडा विश्वात भारताची दखल घेण्यासाठी जगाला भाग पाडले होते. मिल्खा सिंग यांचा मुलगा जीव मिल्खा हा प्रसिद्ध गोल्फपटू आहे.