भारत चार गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता
By admin | Published: January 31, 2015 11:18 PM2015-01-31T23:18:53+5:302015-01-31T23:18:53+5:30
तिरंगी मालिकेतील लाजिरवाण्या कामगिरीनंतर संघाची फलंदाजी मजबूत करण्यासाठी विश्वकप स्पर्धेत भारतीय संघ चार स्पेशालिस्ट गोलंदाजांसह खेळू शकतो,
पर्थ : तिरंगी मालिकेतील लाजिरवाण्या कामगिरीनंतर संघाची फलंदाजी मजबूत करण्यासाठी विश्वकप स्पर्धेत भारतीय संघ चार स्पेशालिस्ट गोलंदाजांसह खेळू शकतो, असे संकेत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दिले आहेत.
आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाकडून तिरंगी मालिकेत चांगल्या कामगिरीची आशा होती, पण दिग्गज फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्यामुळे भारताला या मालिकेत एकही विजय साकारता आला नाही. धोनी म्हणाला, ‘‘आम्ही तीन वेगवान व दोन फिरकीपटूंसह खेळू शकत नाही. कारण त्यामुळे आमची फलंदाजी कमकुवत होते.’’
शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध तीन गड्यांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय कर्णधाराने विश्वकप स्पर्धेसाठी संभाव्य रणनीतीचे संकेत देताना म्हटले, ‘‘जर तुम्ही नाणेफेक गमाविली आणि वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना काही विकेट लवकर गमाविल्यात तर संघ अडचणीत येतो. या वेळी आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या संयुक्त यजमानपदाखाली विश्वकप स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. चांगली कामगिरी करण्याची क्षमता असलेल्या फलंदाजांचा आमच्या संघात समावेश आहे, पण प्रथम श्रेणी क्रिकेट व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी करणे वेगळे आहे. त्यासाठी आम्ही रवींद्र जडेजाला बराच वेळ दिला असून तो आता अष्टपैलू म्हणून ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.’’
तिरंगी मालिकेतील चार सामन्यांत केवळ एक धाव व दोन विकेट घेणाऱ्या अक्षर पटेलबाबत बोलताना धोनी म्हणाला, ‘‘आम्हाला माहिती आहे की तो फलंदाजी करू शकतो, पण अधिक सामने खेळल्यानंतर तो परिपक्व होईल. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट व प्रथम श्रेणी क्रिकेट यामध्ये बराच फरक आहे. आम्हाला आमची फलंदाजी अधिक मजबूत करावी लागेल. तळाचे फलंदाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.’’
विश्वकप स्पर्धेत कामगिरीत सातत्य राखण्याबाबत बोलताना धोनी म्हणाला,‘‘आत्मविश्वासाचा विचार करता आम्ही चांगल्या स्थितीत आहोत. आम्ही योग्य रणनीती लागू करण्यावर भर दिला. पराभवाचे चक्र कसे भेदायचे याची आम्हाला चांगली कल्पना आहे. भारतीय संघ बऱ्याच दिवसांपासून येथे आहे. आमच्याकडे अद्याप १० दिवसांचा कालावधी आहे.’’
संघाच्या विश्वकप स्पर्धेच्या तयारीबाबत बोलताना धोनी म्हणाला, ‘‘या विश्रांतीच्या कालावधीत क्रिकेटपासून दूर राहणार आहे. खेळाडूंचा उत्साह कसा वाढवायचा, हा पत्रकार परिषदेत सांगण्याचा विषय नाही. हे क्रिकेटच्या मैदानावर शक्य नाही. त्यासाठी ब्रेकची गरज आहे. आम्ही दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून येथे आहोत. आम्हाला येथील वातावरणाची सवय झाली आहे. आता क्रिकेटपासून ब्रेक घेत पुढे काय करायचे, याचा विचार करणार आहे.’’ (वृत्तसंस्था)
मी तळाच्या फळीत असल्यामुळे त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविले. तळाला बिन्नी व जडेजा हे फलंदाजही होते. आमची तळाची फळी मजबूत भासत होती. सुपर ओव्हर्समध्ये सलामीवीराला फलंदाजीसाठी पाठवू शकत नाही. नेहमीच्या लढतीत तुम्ही सलामीवीरांना फलंदाजीची जबाबदारी सोपवू शकतो, पण सुपर ओव्हरमध्ये फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजाला पाठविणे आवश्यक ठरते. परिस्थिती ओळखून
निर्णय घ्यावे लागतात. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत स्टार फलंदाज विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविण्याच्या निर्णय घेतला.
- महेंद्रसिंह धोनी