भारत आॅस्ट्रेलियाकडून पराभूत

By admin | Published: May 3, 2017 12:39 AM2017-05-03T00:39:44+5:302017-05-03T00:39:44+5:30

भारताने सुरुवातीला चमकदार कामगिरी करीत आघाडी घेतली; पण तरी अझलान शाह कप हॉकी स्पर्धेच्या साखळी लढतीत

India lose by Australia | भारत आॅस्ट्रेलियाकडून पराभूत

भारत आॅस्ट्रेलियाकडून पराभूत

Next

इपोह : भारताने सुरुवातीला चमकदार कामगिरी करीत आघाडी घेतली; पण तरी अझलान शाह कप हॉकी स्पर्धेच्या साखळी लढतीत मंगळवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध १-३ ने पराभव स्वीकारावा लागला.
पहिल्या क्वॉर्टरमध्ये विश्व चॅम्पियन संघाला बरोबरीत रोखल्यानंतर भारताने २५ व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने नोंदवलेल्या मैदानी गोलच्या जोरावर आघाडी घेतली होती, पण आॅस्ट्रेलियाने त्यानंतर तीन मैदानी गोल नोंदवत राऊंड रॉबिन पद्धतीने खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत वर्चस्व कायम राखले.
आॅस्ट्रेलियातर्फे एडी ओकेनडेन (३० वा मिनीट), टॉम क्रेग (३४ वा मिनीट) आणि टॉम विकहॅम (५१ वा मिनीट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. भारतीय संघाने अखेरच्या क्वॉर्टरमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही.
अझलान शाह कपमध्ये नऊवेळा जेतेपद पटकावणाऱ्या आॅस्ट्रेलियाने आतापर्यंत तीन लढतींमध्ये ७ गुणांची कमाई केली आहे, तर गेल्या वर्षीच्या उपविजेत्या भारतीय संघाच्या खात्यावर तीन सामन्यांतून केवळ चार गुणांची नोंद आहे. आॅस्ट्रलियाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. पहिल्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला, पण भारतीय बचाव फळीने त्यांचे आक्रमण परतावून लावले. क्रेकला डायलन वोदरस्पूनच्या क्रॉसवर चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविता आला नाही. त्यानंतर दोन मिनिटांनी भारताने पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवला. हरमनप्रीतला त्यावर गोलजाळ्याचा वेध घेता आला नाही. आकाशदीप सिंगने आठव्या मिनिटाला मनदीप सिंगला पास दिला, पण त्याला आॅस्ट्रेलियन बचावफळीला गुंगारा देण्यात अपयश आले. भारताला त्यानंतर पुढच्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण रुपिंदर पाल सिंगचा फ्लिकचा फटका आॅस्ट्रेलियन गोलकिपर टायलर लोवेलने सहजपणे थोपवला. आकाशदीपला त्यानंतर प्रदीप मोरच्या क्रॉसवर गोल नोंदवण्याची संधी होती, पण त्यात तो अपयशी ठरला. (वृत्तसंस्था)
दरम्यान, गोलकिपर श्रीजेश दुखापतग्रस्त झाला. त्याच्या स्थानी आकाश चिकटेने १३ व्या मिनिटापासून गोलकिपरची भूमिका बजावली. सरदार सिंगने २३ व्या मिनिटाला एक चांगली चाल रचली, पण आकाशदीपला चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविता आला नाही. अखेर २६ व्या मिनिटाला हरमनप्रीतने मैदानी गोल नोंदवित भारताला आघाडी मिळवून दिली. गोलकिपर चिकटेने आॅस्ट्रेलियाचा पेनल्टी कॉर्नर रोखला, पण ओकेनडेनने जेरमी हेवार्डच्या क्रॉसवर गोल
नोंदिवत संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

प्रत्युत्तरात भारताची चांगली चाल, पण ठरली व्यर्थ

क्रेगने त्यानंतर कर्णधार मॅथ्यू स्वानच्या पासवर गोल नोंदवित संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. प्रत्युत्तरात भारताने चांगली चाल रचली, पण आॅस्ट्रेलियन गोलकिपरने भारताचे प्रयत्न हाणून पाडले.

भारताला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण हरमनप्रीतच्या फ्लिकवर गोलकिपरने उत्कृष्ट बचाव केला. आॅस्ट्रेलियातर्फे तिसरा गोल टॉम विकहॅमने नोंदवला. त्याने भारताच्या तीन बचावपटूंना गुंगारा देत मारलेला आक्रमक फटका थेट गोलजाळ्यात विसावला.

भारताने अखेरच्या क्षणी आक्रमक पवित्रा स्वीकारला. गोलकिपरला हटवित एका अन्य खेळाडूला मैदानात उतरविले, पण आॅस्ट्रेलियाच्या बचावफळीने कुठलीही संधी दिली नाही.

Web Title: India lose by Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.