नेदरलँडकडून भारत पराभूत
By admin | Published: June 20, 2017 09:52 PM2017-06-20T21:52:08+5:302017-06-20T22:00:16+5:30
वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरीच्या स्पर्धेतल्या चौथ्या सामन्यात भारतावर पराभवाची नामुष्की ओढावली आहे.
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 20 - वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरीच्या स्पर्धेतल्या चौथ्या सामन्यात भारतावर पराभवाची नामुष्की ओढावली आहे. हॉकीमध्ये नेदरलँडने भारतावर 3-1नं विजय मिळवला आहे. नेदरलँडनं सुरुवातीपासून सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. नेदरलँडच्या संघानं भारतावर एका पाठोपाठ एक हल्ले चढवण्यास सुरुवात केली. 12व्या मिनिटाला सँडर ब्राट आणि 24व्या मिनिटाला मिरको प्रुजिसेरने गोल करत भारताला पराभवाच्या छायेत नेऊन सोडले.
एस. व्ही. सुनील आणि आकाशदीप सिंहने चाल करत नेदरलँडवर गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र गोलरक्षक पिरमीन ब्लाकने भारताला रोखून धरले. हरमनप्रीत सिंहने घेतलेला प्रत्येक ड्रॅगफ्लिकचा फटका नेदरलँडचा गोलरक्षक पिरमीन ब्लाकने परतावून लावला. आघाडीच्या फळीतल्या आकाशदीप सिंहने भारताकडून एकमेव गोल केला. इतर खेळाडूंना आजच्या सामन्यात चमकदार कामगिरी दाखवता आली नाही. पराभवाची नामुष्की ओढवल्यामुळे ब गटात भारताचा संघ 9 गुणांसह दुसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे.