भारताने एकहाती दबदबा राखत नोंदवला ‘गोल्डन क्लीन स्वीप’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 02:49 AM2019-07-23T02:49:41+5:302019-07-23T06:22:35+5:30
राष्ट्रकुल टेबल टेनिस : प्रत्येक गटाची अंतिम लढत भारतीयांमध्येच रंगली
कटक : हरमीत देसाई आणि आहिका मुखर्जी यांनी ऐतिहासिक कामगिरी करताना सोमवारी २१व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीचे सुवर्ण पदक पटकावले. विशेष म्हणजे यासह भारतीय संघाने स्पर्धेतील सर्व ७ सुवर्ण पदक जिंकताना ‘गोल्डन क्लीन स्वीप’ नोंदवला.
दोन्ही गटातील अंतिम सामना भारतीय खेळाडूंमध्येच रंगला. पुरुषांमध्ये हरमीतने दमदार खेळ करताना आघाडीचा खेळाडू जी. साथियान याचा ९-११, ६-११, ११-५, ११-८, १७-१५, ७-११, ११-९ असा पराभव केला. पहिले दोन गेम गमावून पिछाडीवर पडल्यानंतरही हरमीतने हार न मानता झुंजार खेळाच्या जोरावर विजयी पुनरागमन केले. त्याचवेळी महिला गटातील अंतिम सामना मात्र एकतर्फी रंगला. आहिकाने जबरदस्त खेळ करताना माजी राष्ट्रीय विजेती मधुरिका पाटकरचा ११-६, ११-४, ११-९, १९-१७ असा सहज पराभव केला. आहिकाचे हे स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक ठरले. पुरुष दुहेरीतील अंतिम सामनाही भारतीय खेळाडूंमध्येच रंगला. यामध्ये अँथोनी अमलराज-मानव ठक्कर या जोडीने अनपेक्षित बाजी मारत साथियान-शरथ कमल या अनुभवी जोडीचा ८-११, ११-६, १३-११, १२-१० असा पराभव केला. त्याचप्रमाणे, महिला दुहेरीतील अंतिम सामनाही यजमानांमध्ये रंगला आणि यामध्ये पूजा सहस्त्रबुध्दे-कृत्विका सिन्हा राय यांनी सुवर्ण जिंकले. त्यांनी सहज बाजी मारताना श्रीका अकुला-मौसमी पॉल यांचा ११-९, ११-८, ९-११, १२-१० असा पाडाव केला.
यजमान भारताने स्पर्धेवर आपला दबदबा राखताना ७ सुवर्ण पदकांची लयलूट करत ५ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण १५ पदकांची कमाई केली. इंग्लंडने दुसरे स्थान मिळवताना २ रौप्य आणि तीन कांस्य पदक जिंकले. तिसऱ्या स्थानावरील सिंगापूरला सहा कांस्य पदकांवर समाधान मानावे लागले. मलेशिया आणि नायजेरिया या संघांनी प्रत्येकी एक कांस्य पदक जिंकण्यात यश मिळवले.