भारत चेक गणराज्यकडून पराभूत
By admin | Published: September 20, 2015 11:53 PM2015-09-20T23:53:16+5:302015-09-20T23:53:16+5:30
युकी भांबरीची जादूदेखील चालू शकली नाही आणि अनेकदा मिळालेली संधी गमावल्यामुळे तो जागतिक क्रमवारीतील ४० व्या क्रमांकावर असणाऱ्या जेरी वेस्लीकडून पराभूत झाला.
डेव्हिस कप : एशिया-ओशियाना झोनमध्येच राहणार भारत
नवी दिल्ली : युकी भांबरीची जादूदेखील चालू शकली नाही आणि अनेकदा मिळालेली संधी गमावल्यामुळे तो जागतिक क्रमवारीतील ४० व्या क्रमांकावर असणाऱ्या जेरी वेस्लीकडून पराभूत झाला. त्यामुळे डेव्हिस कप विश्व ग्रुप प्लेआॅफ लढतीत भारताला अव्वल मानांकित चेक गणराज्यकडून १-३ अशा पराभवाचा सामना करावा लागला.
युकीला चौथ्या सामन्यात आज येथे वेस्लीकडून ३-६, ५-७, २-६ असा दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताला पुढील वर्षाच्या स्पर्धेसाठी एशिया-ओशियाना ग्रुप एकमध्येच राहावे लागणार आहे, तसेच अव्वल मानांकित आणि तीन वेळेसचा चॅम्पियन चेक गणराज्यने १६ देशांच्या एलिट विश्व ग्रुपमध्ये पुन्हा स्थान मिळवले.
भारताला आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी युकीचा सामना जिंकणे आवश्यक होते; परंतु दिल्लीचा हा २३ वर्षीय खेळाडू जिगरबाज खेळ करू शकला नाही आणि वेस्लीकडून तो सहजपणे पराभूत झाला.
न्यूझीलंडमध्ये जुलै महिन्यात सुरेख कामगिरी करणाऱ्या युकीने येथे आपले दोन्हीही सामने गमावले. त्याने न्यूझीलंडमधील दोन्ही सामने जिंकले होते. ज्यात निर्णायक पाचवा सामना होता. त्यामुळे भारत प्लेआॅफमध्ये पोहोचला होता.
लिएंडर पेस आणि रोहन बोपण्णा या जोडीच्या दुहेरीतील पराभवाने भारताच्या शक्यतेला जोरदार धक्का बसला होता. या सामन्याचा निकाल लागला होता. त्यामुळे दोन्ही संघांनी सोमदेव देववर्मन आणि लुकास रोसोल यांच्यातील औपचारिक सामना न खेळण्याचा निर्णय घेतला.
भारत मार्च २०११ नंतर प्रथमच विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात होता. तेव्हा भारत पहिल्याच फेरीत सर्बियाकडून १-४ असा पराभूत झाला होता.
पहिला सेट गमावल्यानंतर युकीला दुसऱ्या सेटमध्ये वेस्लीची सर्व्हिस भेदण्याची पाच वेळेस संधी मिळाली; परंतु त्यातील
एकाही संधीचा लाभ तो घेऊ
शकला नाही. आठव्या गेममध्ये मिळालेल्या तीन संधींपैकी तो एकदाही गुण मिळवू शकला नाही आणि हीच बाब त्याच्या पराभवास कारणीभूत ठरली. २ तास १४ मिनिटे रंगलेल्या लढतीत जोरदार सर्व्हिस करणाऱ्या वेस्ली यानेच पूर्ण वर्चस्व राखले. (वृत्तसंस्था)