भारत पराभवाच्या छायेत, ३३० धावांवर आटोपला पहिला डाव
By Admin | Published: July 30, 2014 04:23 PM2014-07-30T16:23:43+5:302014-07-30T16:28:16+5:30
चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर अवघ्या सात धावांची भर टाकून भारताचा खेळ आटोपला असून २३९ धावांची आघाडी इंग्लंडला मिळाल्यामुळे भारत पराभवाच्या छायेत आहे.
ऑनलाइन टीम
साउदम्पटन (इंग्लंड), दि. ३० - चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर अवघ्या सात धावांची भर टाकून भारताचा खेळ आटोपला असून २३९ धावांची आघाडी इंग्लंडला मिळाल्यामुळे भारत पराभवाच्या छायेत आहे. पहिल्या डावात ५६९ धावांचा डोंगर इंग्लंडने उभा केल्यानंतर भारताचा डाव अवघ्या ३३० धावांमध्ये आटोपला आणि एक कसोटी जिंकत मालिकेत आघाडी घेतलेला भारत तिसरी कसोटी हरण्याची शक्यता निर्माण झाली. आज संपूर्ण दिवसाचा खेळ शिल्लक असून पाचशे धावांची आघाडी घेत इंग्लंड भारताला खेळण्यासाठी पाचारण करेल आणि लवकरात लवकर भारताला गुंडाळून कसोटी जिंकण्याचा प्रयत्न करेल हे उघड आहे. पहिल्या डावात अयशस्वी ठरलेल्या भारताच्या सलामीच्या व मधल्या फळीतल्या खेळाडूंवर हा सामना वाचवण्याची मदार असेल असे दिसत असून सध्यातरी पारडे इंग्लंडच्या बाजुने झुकल्याचे दिसत आहे. इंग्लंडचा तेज गोलंदाज जेम्स अँडरसनने पाच बळी घेत भारतीय फलंदाजीचा कणा मोडला आणि इंग्लंडला सामन्यावर वर्चस्व मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.