भारत न्यूझीलंडकडून पराभूत, आता अर्जेंटिनाशी लढत
By admin | Published: July 1, 2016 08:38 PM2016-07-01T20:38:42+5:302016-07-01T20:38:42+5:30
भारतीय पुरुष हॉकी संघाला सहा देशांच्या निमंत्रित स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध 0-१ गोलने पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचा हा दुसरा पराभव ठरला असून, त्यांची लढत
वेलेंसिया : भारतीय पुरुष हॉकी संघाला सहा देशांच्या निमंत्रित स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध 0-१ गोलने पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचा हा दुसरा पराभव ठरला असून, त्यांची लढत आता अर्जेंटिना संघाविरुद्ध आहे.
काल रात्री झालेल्या लढतीत एकमेव गोल १८ व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या स्टीफन जेसेन याने केला.
याआधी जर्मनीने भारतावर ४-0 अशी मात केली होती तसेच पुढच्या संघर्षपूर्ण सामन्यात भारताने आयर्लंडवर २-१ अशी मात केली. भारतीय संघ आता गुणतालिकेत चौथ्या स्थानी असून, एक विजय आणि तीन पराजयानंतर त्यांचे फक्त ३ गुण आहेत. आॅलिम्पिक चॅम्पियन जर्मनी आणि अर्जेंटिना सहा गुणांसह सर्वात पुढे आहेत, तर स्पेनचे दोन सामन्यांत ३ गुण झाले आहेत.
भारताला विजेतेपदाच्या शर्यतीत राहायचे असेल, तर सरदार सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उद्या कोणत्याही परिस्थितीत अर्जेंटिनाला नमवावे लागणार आहे. जागतिक क्रमवारीत भारत पाचव्या आणि अर्जेंटिना सातव्या स्थानी आहे. तथापि, अर्जेंटिनाविरुद्ध भारताचा मार्ग सोपा नाही. कारण त्यांनी आतापर्यंत या स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली आहे. भारताला अर्जेंटिनाला पराभूत करायचे असल्यास कामगिरीत सातत्य दाखवून चुका होऊ न देण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. भारतीय संघ अखेरच्या राऊंड रॉबिन लढतीत रविवारी स्पेनविरुद्ध खेळणार आहे. ही स्पर्धा आॅगस्टमध्ये होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.