आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं रचला इतिहास; २५ गोल्डसह १०० पदके पटकावली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 08:39 AM2023-10-07T08:39:51+5:302023-10-07T08:41:20+5:30

आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे

India made history in the Asian Games; Won 100 medals including 25 golds | आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं रचला इतिहास; २५ गोल्डसह १०० पदके पटकावली

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं रचला इतिहास; २५ गोल्डसह १०० पदके पटकावली

googlenewsNext

हांगझाउ – चीनमध्ये होणाऱ्या यंदाच्या आशियाई क्रिडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी केली आहे. भारतानं आतापर्यंत या स्पर्धेत एकूण १०० पदके पटकावली आहेत. यामध्ये २५ सुवर्णपदके आहेत. भारताच्या मुलींनी महिला कबड्डीमध्ये चिनी तैपेईचा २६-२४ असा रोमहर्षक अंतिम सामन्यात पराभव करून सुवर्णपदक जिंकले. भारतासाठी हे ऐतिहासिक सुवर्णपदक आहे. कारण यामुळे भारताला एकूण १०० वे पदक आणि २५ वे सुवर्ण मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कबड्डी संघाचे अभिनंदन केले आहे.

तिरंदाजी कंपाऊंड वैयक्तिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ओजस देवतळेने अभिषेक वर्माचा १४८-१४७ असा पराभव केला. अशा प्रकारे भारताने या स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकांवर कब्जा केला. तिरंदाजीच्या महिलांच्या कंपाऊंड स्पर्धेत भारताच्या ज्योती वेन्नमने दक्षिण कोरियाच्या सो चाएचा १४९-१४५ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. अदिती स्वामीने कंपाऊंड वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. विश्वचषक सुवर्णपदक विजेत्या ज्योतीने तिसरे वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले आहे. जेव्हा एशियाडमध्ये स्पर्धा सुरू झाल्या तेव्हा दिवसाचे पहिले पदकही भारताच्या ज्योती वेन्नमने जिंकले होते.

आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनी महिला कबड्डी संघ आणि तिरंदाजी संघाचे कौतुक केले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. बिर्ला म्हणाले की, भारतीय खेळाडूंनी १०० पदकांचा संकल्प पूर्ण केला आहे, आमचे खेळाडू आज जगात कोणाहीपेक्षा कमी नाहीत. त्यांची मेहनत आणि विश्वासामुळे देशाचा गौरव वाढला आहे. आता ती वेळ दूर नाही जेव्हा भारत प्रत्येक खेळात वर्चस्व गाजवेल असं त्यांनी म्हटलं.

तर आशियाई स्पर्धेतील कामगिरी भारतासाठी महत्त्वाची आहे. खेळाडूंच्या यशाने इतिहास रचला आहे, आम्हाला त्याचा अभिमान आहे. मी १० तारखेला आमच्या आशियाई खेळांच्या टीमचं स्वागत करण्यासाठी आणि आमच्या खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे. भारतानं आतापर्यंत आशियाई क्रिडा स्पर्धेत १०० पदके मिळवली असून त्यात २५ गोल्ड, ३५ सिल्व्हर आणि ४० ब्राँझ मेडेल आहेत.

Web Title: India made history in the Asian Games; Won 100 medals including 25 golds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.