भारताला ‘क्लीन स्वीप’ची संधी
By Admin | Published: July 14, 2015 02:59 AM2015-07-14T02:59:58+5:302015-07-14T02:59:58+5:30
मालिकेत अपराजित आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाला मंगळवारी झिम्बाब्वेविरुद्ध तिसरा आणि अखेरचा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत ‘क्लीन स्वीप’ करण्याची संधी असेल.
हरारे : मालिकेत अपराजित आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाला मंगळवारी झिम्बाब्वेविरुद्ध तिसरा आणि अखेरचा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत ‘क्लीन स्वीप’ करण्याची संधी असेल.
पहिला सामना ४ धावांनी जिंकल्यानंतर चुकांपासून बोध घेऊन अष्टपैलू कामगिरीच्या बळावर कालच्या लढतीत भारताने ६२ धावांनी विजय साजरा केला. कर्णधार अजिंक्य रहाणे ६३ आणि सलामीवीर मुरली विजय ७२ तसेच अंबाती रायुडू ४१ यांनी दमदार फलंदाजी करून विजयाचा पाया रचला. तथापि रायुडूचे जखमी होणे भारतीय संघासाठी धक्कादायक ठरले. त्याची जागा संजू सॅमसन याने घेतली आहे. उद्या मनीष पांडे वन डेत पदार्पण करेल, अशी शक्यता आहे. सॅमसन सामन्याच्या वेळेपर्यंत पोहोचू शकणार नसल्याने पांडेची वर्णी लागू शकते. फलंदाजांसोबत गोलंदाजांची कामगिरीही अप्रतिम झाली. पहिल्या सामन्यात दिशाहीन मारा करणाऱ्या या गोलंदाजांनी काल परिस्थितीचा पुरेपूर लाभ घेतला.
भुवनेश्वर कुमारने ४ गडी बाद केले, तर सिनियर आॅफ स्पिनर हरभजनसिंग याने १० षटकांत २९ धावा देऊन एक गडी बाद केला. झिम्बाब्वेच्या नजरा पहिल्या सामन्यातील भरीव कामगिरीची पुनरावृत्ती करण्याकडे असतील. त्यांच्या हितावह बाब अशी, की त्यांच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधीच दिली नाही. सातत्याने धावा रोखल्यामुळे भारतीय फलंदाजांवर दडपण आले होते. फलंदाजीत सलामीचा चामू चिभाभा हा एकटा संघर्ष करीत आहे. त्याची सोबत करण्यासाठी अन्य फलंदाजांना धावा काढाव्याच लागतील. (वृत्तसंस्था)
रायुडू झिम्बाब्वे दौऱ्यातून ‘आउट’; सॅमसनचा संघात समावेश
हरारे : यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन याचा जखमी अंबाती रायुडू याच्या जागी झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. सॅमसनच्या समावेशाला बीसीसीआयच्या मेडिकल टीमने दुजोरा दिला आहे. दुसऱ्या वनडेदरम्यान अंबाती रायुडूला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो झिम्बाब्वे दौऱ्यातील उर्वरित सामने खेळू शकणार नाही. त्याला दोन ते तीन आठवडे रिहॅबिलिटेशनची आवश्यकता आहे. त्यामुळे राष्ट्रीय निवड समितीने अंबाती रायुडूचा पर्याय म्हणून संजू सॅमसनला पाठवण्यात आल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. सॅमसनला भारतीय संघात पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून चांगली कामगिरी केली आहे.