भारताला ‘क्लीन स्वीप’ची संधी

By admin | Published: January 31, 2016 03:10 AM2016-01-31T03:10:39+5:302016-01-31T03:10:39+5:30

मालिका आधीच खिशात घालणाऱ्या भारतीय संघाकडे आज रविवारी तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात यजमान आॅस्ट्रेलियाचा पराभव करीत ‘क्लीन स्वीप’सह दौऱ्याचा सकारात्मक

India offers 'Clean sweep' opportunity | भारताला ‘क्लीन स्वीप’ची संधी

भारताला ‘क्लीन स्वीप’ची संधी

Next

सिडनी : मालिका आधीच खिशात घालणाऱ्या भारतीय संघाकडे आज रविवारी तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात यजमान आॅस्ट्रेलियाचा पराभव करीत ‘क्लीन स्वीप’सह दौऱ्याचा सकारात्मक शेवट करण्याची नामी संधी असेल.
वन डे मालिकेत १-४ ने पराभूत झालेल्या भारतीय संघाने मुसंडी मारून टी-२० मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून २-० ने निर्णायक आघाडी संपादन केली आहे. या दौऱ्यात युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. टी-२० विश्वचषक, २०१७ चा चॅम्पियन्स आणि २०१९ च्या वन डे विश्वचषकाची तयारी म्हणून गुरकिरत मान, ऋषी धवन आणि बरिंदर सरन यांच्यासारख्या खेळाडूंची कामगिरी न्याहाळण्यात आली. टी-२० त जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या या दोघांच्या समावेशाने टीमचे संयोजनही चांगले बनले. बुमराहने दोन्ही सामन्यांत देखणी कामगिरी केली आहे.
पंड्या वेगवान गोलंदाज म्हणून उपयुक्त ठरला. युवराज आणि सुरेश रैना यांची संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका आहे. शुक्रवारी युवराजने स्वत:ची उपस्थिती मोलाची ठरविली होती. दौऱ्याच्या अखेरच्या सामन्यातही विजयी एकादश खेळविण्याचा व्यवस्थापनाचा विचार दिसतो. धोनीने मागच्या सामन्यानंतर प्रयोग टाळण्याचे संकेत दिलेच आहेत.
युवराजला गोलंदाजीत संधी मिळाली, पण फलंदाजीची क्षमता तपासणे अद्याप शिल्लक आहे. विश्वचषक टी-२० साठी संघात निवडण्यात आलेले खेळाडू श्रीलंकेविरुद्ध मालिकेत खेळणार असल्याने युवीला फलंदाजीसाठी चार सामने मिळू शकतात. अजिंक्य रहाणे आणि मनीष पांडे हे पर्याय असले तरी युवी गोलंदाजीतही सरस असल्याने त्याला वगळणे चुकीचे ठरेल.
फिरकी गोलंदाजांची भूमिका मोठी असल्याने हरभजनला खेळविले जाऊ शकते. आशिष नेहरा दोन्ही सामन्यांत महागडा ठरल्याने उमेश यादवचे नावदेखील अंतिम ११ जणांत येण्याची शक्यता आहे. आॅस्ट्रेलिया संघ टी-२० विश्वचषकापेक्षा न्यूझीलंड दौऱ्याबाबत काळजीत आहे. या संघाने डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांना आधीच न्यूझीलंडकडे रवाना केले. याशिवाय मॅथ्यू वेड, जॉन हेस्टिंग्ज आणि केन रिचर्डसनदेखील न्यूझीलंडमध्ये दाखल झाले आहेत. अ‍ॅरॉन फिंच मांसपेशी ताणल्या गेल्याने बाहेर बसला. उस्मान ख्वाजाची संघात वर्णी लागली. मॅथ्यू वेडचे स्थान यष्टिरक्षणात कॅमेरून बेनक्रॉफ्ट घेईल. अन्य खेळाडू कोण राहतील, हे सामन्याआधीच कळेल.(वृत्तसंस्था)

भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, हार्दिक पंड्या, गुरकिरत मान, ऋषी धवन, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, हरभजनसिंग, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, उमेश यादव आणि अजिंक्य रहाणे.

आॅस्ट्रेलिया : शेन वॉटसन (कर्णधार), कॅमेरून बेनक्रॉफ्ट, स्कॉट बोलॅन्ड, कॅमेरून बायस, जेम्स फॉल्कनर, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, नाथन लियॉन, ख्रिस लिन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, शॉन टेट आणि अ‍ॅन्ड्र्यू टाय.

सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजून ०८ मि. पासून

Web Title: India offers 'Clean sweep' opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.