इंडिया ओपन मुष्टियुद्ध : मेरी कोम फायनलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 01:12 AM2018-02-01T01:12:11+5:302018-02-01T01:12:52+5:30
पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन एम. सी. मेरि कोमने इंडिया ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली आहे; परंतु शिवा थापाला उपांत्य फेरीतील पराभवानंतर कास्यपदकावरच समाधान मानावे लागले.
नवी दिल्ली - पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन एम. सी. मेरि कोमने इंडिया ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली आहे; परंतु शिवा थापाला उपांत्य फेरीतील पराभवानंतर कास्यपदकावरच समाधान मानावे लागले.
बाराव्या मानांकित मेरिकोमचा ४८ किलो वजन गटात मंगोलियाच्या अल्टेनसेटसेग हिच्याशी होता. मेरिकोमने प्रारंभापासूनच आघाडी घेत आक्रमक पवित्रा अवलंबला. अखेरच्या मिनिटात ती थकली होती; परंतु तिने तिची लय कायम ठेवली. आता तिचा सामना फिलिपाईन्सच्या जोसी गाबुको हिच्याशी होईल. गाबुकोने द्वितीय मानांकित स्थानिक खेळाडू मोनिकावर विजय मिळवला.
पुरुष गटात विश्व आणि आशियाई पदकविजेत्या शिवा थापाला ६0 किलो वजन गटात कास्यपदकावर समाधान मानावे लागले. तो भारताच्याच मनीष कौशिक याच्याकडून पराभूत झाला. मनीषकडून शिवा याला दुसºयांदा पराभव पत्करावा लागला. याआधी गेल्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने शिवाला पराभूत केले होते. आशियाई कास्यपदकप्राप्त आणि फ्लायवेटमधील अव्वल मानांकित अमित पांगल फायनलमध्ये पोहोचला आहे. त्याने आपल्याच देशाच्या एन. लालगियाकिम्मा याला पराभूत केले. महिला गटात अव्वल मानांकित एल. सरिता देवी हिने ६0 किलो वजन गटात आपल्याच देशाच्या प्रियंकाला पराभूत केले. आता तिची लढत फिनलँडच्या आॅलिम्पिक आणि विश्व कास्यपदकप्राप्त मीरा पोटकोनेन हिच्याशी होईल.
विश्व युवा चॅम्पियन आणि अव्वल मानांकित शशी चोपडाने ५७ किलो वजन गटात आपल्याच देशाच्या सोनियाला पराभूत केले. माजी विश्व रौप्यपदकप्राप्त सरजूबाला देवी हिने ५१ किलो वजन गटात कास्यपदक जिंकले.