इराणकडून भारत ‘आउट’
By admin | Published: September 22, 2016 01:16 AM2016-09-22T01:16:19+5:302016-09-22T01:16:19+5:30
16 वर्षांखालील एएफसी फुटबॉल चषक : 3-0 ने मात, भारताचे आव्हान संपुष्टात
Next
16 र्षांखालील एएफसी फुटबॉल चषक : 3-0 ने मात, भारताचे आव्हान संपुष्टातमडगाव : दुसर्या हाफमध्ये अधिक वेळ दहा खेळाडूंसह खेळणार्या भारतीय संघाला इराणने पराभूत केले. 3-0 अशा पराभवानंतर भारतीय संघाचे 16 वर्षांखालील एएफसी फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. इराणचा कर्णधार मोहम्मद शरीफने पेनल्टीवर दोन गोलची नोंद केली. त्याने 80 व्या आणि इन्जुरी वेळेत गोल नोंदवला. त्याआधी, पहिला गोल मोहम्मद गादेरी याने 23 व्या मिनिटाला नोंदवला. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. इराणविरुद्ध विजयी निकाल लावून भारतीय संघ आगेकूच करण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र, बुधवारच्या निकालाने भारताच्या आशेवर पाणी फेरले. तीन सामन्यांतून भारताला केवळ एकाच गुणावर समाधान मानावे लागले. इराणने तीन सामन्यांतून 7 गुणांसह ‘अ’ गटात अव्वल स्थान प्राप्त केले. विजयानंतर इराणने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उभय संघांनी सावध सुरुवात केली होती. मात्र, 23व्या मिनिटाला इराणला गोल नोंदवण्यात यश आले. गादेरी याने अमेद खोदामोरादीच्या पासवर बचावपटूंना भेदत गोल नोंदवला. पहिल्या हाफमध्ये भारताला केवळ एकच संधी मिळाली होती. 17 व्या मिनिटाला कोलमने लालगमाविया याला बॉक्समध्ये चेंडू दिला. मात्र, तो गोल नोंदवण्यात अपयशी ठरला.दुसर्या हाफमध्ये भारताला 55 व्या मिनिटाला झटका बसला जेव्हा बोरीस याला दुसरे पिवळे कार्ड दाखविण्यात आले. रेड कार्डमुळे त्याला मैदान सोडावे लागले. भारतीय संघ दहा खेळाडूंसह खेळला. त्यांचा बचाव आणि आक्रमकताही कमकुवत झाली होती. याचा फायदा इराण संघाने उठवला. इराण संघाला दोन पेनल्टी मिळाल्या. यावर शरीफ याने झटपट दोन गोल नोंदवत भारताच्या आशा संपुष्टात आणल्या.