पुन्हा रंगणार भारत-पाकिस्तान थरार
By admin | Published: June 24, 2017 02:04 AM2017-06-24T02:04:07+5:302017-06-24T02:04:07+5:30
हॉकी वर्ल्ड लीग उपांत्य फेरी स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर स्पर्धेत पाचव्या ते आठव्या स्थानासाठी
लंडन : हॉकी वर्ल्ड लीग उपांत्य फेरी स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर स्पर्धेत पाचव्या ते आठव्या स्थानासाठी होणाऱ्या सामन्यांसाठी भारतीय संघ सज्ज झाला असून पुन्हा एकदा त्यांच्यापुढे आव्हान असेल ते कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे. शनिवारी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून समाधानकारक स्थान मिळवण्याचे लक्ष्य टीम इंडियाचे असेल.
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या भारताला शुक्रवारी १४व्या स्थानावरील मलेशियाविरुद्ध २-३ असा पराभव पत्करावा लागला. यामुळे भारताला विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. स्पर्धेत भारताच्या कामगिरीत सातत्य राहिले नाही. पराभवानंतर आपल्या सर्व कमजोरी सुधारण्यावर भारतीयांना भर द्यावा लागेल. पाकिस्तानविरुध्द नक्कीच भारताचे पारडे वर असेल. या स्पर्धेच्या साखळी सामन्यात भारतीयांनी पाकिस्तानला ७-१ असे लोळवले असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल. मात्र, असे असले तरी गाफील राहण्याची चूक भारताला महागात पडू शकते.
या सामन्यात साखळी फेरीतील पराभवाचा वचपा काढण्यास पाकिस्तान संघ उत्सुक असेल. त्यामुळे पुन्हा अटीतटीचा खेळ पाहण्याची संधी हॉकीप्रेमींना मिळेल.