भारताकडून जर्मनीला पराभवाची सव्याज परतफेड; शूटआऊटमध्ये जर्मनीवर ३-० ने विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 08:30 AM2022-03-14T08:30:50+5:302022-03-14T08:31:05+5:30
फेलिसिया वाइडमॅनने २९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत जर्मनी आघाडी मिळवून दिली.
भुवनेश्वर : एफआयएच प्रो लीग हॉकीच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने शूट आउटपर्यंत रंगलेल्या सामन्यात जर्मनीचा ३-० ने पराभव केला. पहिल्या सामन्यात पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा वचपा काढण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला. या दोन संघांत झालेल्या पहिल्या सामन्याप्रमाणे हा सामनाही निर्धारित वेळत १-१ ने बरोबरीवर होता. मात्र, यावेळी भारतीय महिलांनी पेनल्टी शूट आउटमध्ये चमकदार कामगिरी करत पहिल्या तीनही प्रयत्नात गोलजाळीचा अचूक वेध घेतला, तर जर्मनीला मात्र भारतीय गोलकीपर सविता पुनियाचा अभेद्य बचाव एकदाही भेदता आला नाही.
तत्पूर्वी, फेलिसिया वाइडमॅनने २९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत जर्मनी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ४० व्या मिनिटाला भारताच्या निशाने मैदानी गोल करत भारताला बरोबरी साधून दिली. या सामन्यात भारतीय संघाने विजयसोबतच बोनस गुणांची कमाई केली. जर्मनीला मात्र एका गुणावरच समाधान मानावे लागले. भारताचा पुढचे दोन सामने याच मैदानावर २ आणि ३ एप्रिलला इंग्लंडविरुद्ध होणार आहेत.