भारत दावेदाराप्रमाणे खेळला
By admin | Published: June 6, 2017 05:00 AM2017-06-06T05:00:44+5:302017-06-06T05:00:44+5:30
पाकिस्तानने सहज पराभव स्वीकारल्यामुळे निराश झालेल्या शाहीद आफ्रिदीने चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाची प्रशंसा केली
बर्मिंघम : पाकिस्तानने सहज पराभव स्वीकारल्यामुळे निराश झालेल्या शाहीद आफ्रिदीने चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाची प्रशंसा केली. गत चॅम्पियन भारतीय संघ रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत जेतेपदाच्या दावेदाराप्रमाणे खेळला, असे आफ्रिदी म्हणाला.
पाक संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे सामन्यांची रंगत ओसरली. आयसीसीसाठी लिहिलेल्या स्तंभात आफ्रिदीने म्हटले की, ‘चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत भारत-पाक लढतीत रंगतच नव्हती. कारण पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक झाली. पाकिस्तान समर्थक असल्यामुळे मला हे बघितल्यानंतर दु:ख झाले, पण भारतीय संघाने पुन्हा एकदा वर्चस्व कायम राखले. भारताने प्रबळ दावेदार म्हणून खेळण्यास सुरुवात केली आहे. या लढतीत भारताने एकतर्फी वर्चस्व गाजवले, तर पाकने सहज पराभव स्वीकारला.’
भारताने रविवारी पाकिस्तानचा १२४ धावांनी पराभव करीत शानदार सुरुवात केली. आफ्रिदीने पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदच्या रणनीतीवर टीका केली. आफ्रिदी म्हणाला, ‘सरफराजने नाणेफेकीचा कौल मिळवला. येथील वातावरणात हे महत्त्वाचे होते. पावसाची शक्यता असल्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला लाभ मिळतो, पण रणनीती चुकीची होती. क्षेत्ररक्षणही सुमार दर्जाचे होते. त्यामुळे नाणेफेक जिंकण्याचा संघाला लाभ घेता आला नाही.’ (वृत्तसंस्था)
>कर्णधाराचे डावपेच अकलनापलिकडचे...
मोहम्मद आमिरचे पहिले षटक शानदार होते. नव्या चेंडूने तो बळी घेईल, असे मला वाटत होते. सरफराजने नवा चेंडू इमाद वसीमच्या हाती सोपविल्यामुळे मला आश्चर्य वाटले. मला ही रणनीती पटली नाही. कारण सामना युएईमध्ये खेळला जात नव्हता. भारतीय संघाला आश्चर्यचकित करायचे होते तर त्याने इमादकडून एक-दोन षटके गोलंदाजी केल्यानंतर वेगवान गोलंदाजाला पाचारण करायला हवे होते.
पाकने भारतीय सलामीवीर रोहित शर्मा व शिखर धवन यांना खेळपट्टीवर स्थिरावण्याची संधी दिली. या खेळाडूंना जम बसविण्याची संधी दिली तर त्यानंतर त्यांना रोखणे कठीण होते. पाकिस्तानने नेमकी हीच चूक केली. विराट व युवराज यांनी आमच्या थकलेल्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. हार्दिक पांड्याने आक्रमक खेळी करीत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. पाकचे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे होते. आम्ही अतिरिक्त धावा बहाल करताना काही झेलही सोडले.