कुठल्याही आव्हानासाठी भारत सज्ज

By admin | Published: June 8, 2017 04:20 AM2017-06-08T04:20:47+5:302017-06-08T04:20:47+5:30

चॅम्पियन्सच्या ब गटात भारत दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळेल.

India is ready for any challenge | कुठल्याही आव्हानासाठी भारत सज्ज

कुठल्याही आव्हानासाठी भारत सज्ज

Next

सौरभ गांगुली लिहितात...
चॅम्पियन्सच्या ब गटात भारत दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळेल. हा सामना जिंकल्यास अखेरच्या चार संघात स्थान मिळविणे सोपे जाणार आहे. सध्याचा श्रीलंका संघ आधीसारखा नाही. जयवर्धने आणि संगकाराच्या निवृत्तीनंतर हा संघ पुनर्बांधणीच्या प्रक्रियेतून जात आहे. संघाची पुनर्विभागणी सोपी नसते. प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणे, संधी देणे आणि खेळाडू परिपक्व होणे ही प्रक्रिया आहे.
कागदावर भक्कम असलेल्या भारतीय संघाविरुद्ध लढत देणे लंकेला जड जाणार आहे. तरीही क्रिकेटमध्ये कुठलेही भाकीत करणे योग्य नाही. पहिल्या सामन्यात भारताने पाकला सहज नमविले. पाककडून इतक्या कमकुवत खेळाची अपेक्षा नव्हती. गेल्या १०-१२ वर्षांत भारताने पाकवर वर्चस्व मिळविले आहे. भारत बलाढ्य होत असताना पाक संघ कमकुवत होत गेला. रविवारी सामना सुरू झाल्यापासून पाकला भारताविरुद्ध डावपेचांची अंमलबजावणी करणे कठीण होऊन बसले होते.
गोलंदाजी आणि फलंदाजीतही पाकिस्तानचे खेळाडू चाचपडताना दिसले. पाकच्या फलंदाजांनी एकाही भारतीय गोलंदाजाचे आव्हान स्वीकारले नाही. आधीच नांगी टाकली की काय असे चित्र होते. मी याआधी उभय संघात अशी एकाकी लढत कधीही पाहिली नव्हती. पाकविरुद्ध भारताला जी धाकधूक वाटत असावी ती आता निघून गेली. रोहित आणि शिखर धवन यांनी फलंदाजीत लवकर पकड निर्माण केली. दोघे आता चांगले सलामीवीर बनले आहेत. स्पर्धेत ही जोडी महत्त्वाची भूमिका बजावेल. कोहलीदेखील फॉर्ममध्ये आला. पण एक खेळाडू असा होता, ज्याने अंतर निर्माण केले. तो म्हणजे युवराज. युवराजचा धडाका पाहून असे वाटते की भारतीय संघ आता कुठल्याही गोलंदाजाला आव्हान देऊ शकेल. भारताच्या फलंदाजीसाठी हार्दिक पंड्या ‘वरदान’ आहे. विशेष बाब अशी की, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात मधल्या षटकांत खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल ठरतात असे दिसत असले तरी भारतीय संघ व्यवस्थापन दोन फिरकीपटूंना खेळविण्याचा विचार करू शकते. (गेमप्लान)

Web Title: India is ready for any challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.