स्पेनचे आव्हान पेलण्यास भारत सज्ज
By admin | Published: September 15, 2016 11:38 PM2016-09-15T23:38:36+5:302016-09-15T23:38:36+5:30
रताला २०११ नंतर प्रथमच डेव्हिस कप विश्वगटात स्थान मिळवण्याच्या मार्गात स्पेनचे दिग्गज खेळाडू राफेल नदाल आणि डेव्हिड फेरर यांचा अडथळा निर्माण झाला आहे
नवी दिल्ली : भारताला २०११ नंतर प्रथमच डेव्हिस कप विश्वगटात स्थान मिळवण्याच्या मार्गात स्पेनचे दिग्गज खेळाडू राफेल नदाल आणि डेव्हिड फेरर यांचा अडथळा निर्माण झाला आहे, पण यजमान संघाकडे मायदेशातील परिस्थितीचा लाभ घेत धक्कादायक निकाल नोंदवण्याची संधी आहे.
भारत आणि स्पेन संघांदरम्यान आर.के. खन्ना टेनिस स्टेडियममध्ये १६ ते १८ सप्टेंबर या कालावधीत आयोजित डेव्हिस कप विश्व ग्रुप प्ले आॅफ लढतीसाठी स्पेनने बलाढ्य संघ पाठविताना राष्ट्रीय संघात नदाल व फेरर यांचा समावेश केला आहे. या दोन दिग्गज खेळाडूंसह फेलिसियानो लोपेज व मार्क लोपेज हे सुद्धा संघात आहेत.
स्पेनचे चारही खेळाडू जागतिक मानांकनाच्या आधारावर भारतीय खेळाडूंच्या तुलनेत बरेच वरचढ आहेत. नदालने अलीकडेच रिओ आॅलिम्पिकमध्ये एकेरीत उपांत्य फेरी गाठली होती. त्याने मार्क लोपेजच्या साथीने पुरुष दुहेरीत सुवर्णपदकाचा मान मिळवला. वर्षाच्या अखेरच्या ग्रॅण्डस्लॅम यूएस ओपनमध्ये मात्र नदालला उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला.
भारतीय संघात मार्गदर्शकाची भूमिका बजावित असलेल्या पेसला वर्षाच्या अखेरच्या ग्रँडस्लॅम यूएस ओपनमध्ये विशेष चांगला कामगिरी करता आली नाही. त्याला सुरुवातीलाच गाशा गुंडाळावा लागला. मिनेनीने पात्रता फेरीचा अडथळा पार करीत प्रथमच मुख्य फेरी गाठली होती. तेथे त्याला निर्णायक सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला.
डेव्हिस कप लढतीसाठी गेल्या सोमवारी येथे दाखल झाल्यानंतर सरावात व्यस्त असलेल्या नदालच्या नेतृत्वाखालील स्पेन संघ भारताविरुद्धच्या लढतीचा गांभिर्याने विचार करीत आहे. पाहुणा संघ दिल्लीतील उष्ण वातावरणात कसून सराव करीत आहे. गेल्या दोन वर्षांत स्पॅनिश संघाला डेव्हिस कप स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. यावेळी त्यांना विश्व गटात स्थान मिळवण्याची चांगली संधी आहे. भारत आणि स्पेनचे सध्याचे संघ बघितल्यानंतर ही लढत एकतर्फी असल्याचे भासत आहे, पण भारताच्या तुलनेत स्पेनकडे गमावण्यासारखे बरेच काही आहे.
स्पेन संघ २०१४ मध्ये जर्मनीविरुद्ध पहिल्या फेरीत १-४ ने पराभूत झाल्यानंतर विश्व गटातून बाहेर फेकल्या गेला. त्यामुळे स्पेनने यावेळी १६ संघाच्या एलिट गटात स्थान मिळवण्यासाठी सर्वांत बलाढ्य संघ पाठविलेला आहे.
डेव्हिस कप स्पर्धेत यापूर्वी भारत आणि स्पेन संघांदरम्यान तीनदा लढत झाली आहे. त्यात स्पेन २-१ ने आघाडीवर आहे. ५१ वर्षांपूर्वी उभय संघ इंटरझोनल फायनलमध्ये समोरासमोर होते, पण त्यानंतर भारतीय संघाने डेव्हिस कप स्पर्धेतील कामगिरीमध्ये सुधारणा केली आहे. कोरिया व चेक प्रजासत्ताकविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. मायदेशात खेळताना भारतीय संघाला कमी लेखता येणार नाही. या लढतीच्या यशस्वी आयोजनासाठी दिल्ली लॉन टेनिस संघटनेने (डीएलटीए) कंबर कसली असून प्रथमच सायंकाळच्या सत्रात सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. भारताचा न खेळणारा कर्णधार आनंद अमृतराजने यावर टीकाही केली आहे. अमृतराजच्या मते याचा स्पेनला लाभ मिळेल.
लढतीला प्रेक्षक लाभावे यासाठी डीएलटीएने हे पाऊल उचलेले आहे. युवा चाहत्यांना दिग्गज खेळाडूंचा खेळ बघण्याची संधी मिळावी यासाठी डीएलटीए या लढतीचे तिकिटे न विकण्याचा निर्णय घेतला आहे. (वृत्तसंस्था)
मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करीत असून माझ्यासाठी हे महत्त्वाचे आहे. देशाच्या बाहेर खेळताना परिस्थिती आव्हानात्मक असते. भारतीय संघ तुल्यबळ असून त्याच्याकडून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघ मायदेशात खेळत असून त्यांना येथील परिस्थितीचा लाभ मिळेल. आमच्या संघात मानांकनामध्ये अव्वल १०० मध्ये समावेश असलेले खेळाडू आहेत. त्यामुळे विश्व गटात स्थान असणे आवश्यक आहे. त्यामुळे कुठली चूक न करता पुन्हा एकदा विश्वगटात स्थान मिळवण्यासाठी या लढतीत गंभीरपणे खेळणार आहोत. विश्वगटात स्थान मिळवण्याची आमच्याकडे ही एक संधी आहे. त्यामुळे लढत सोपी नाही. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत या लढतीत सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.
-राफेल नदाल,स्पेन
१४ ग्रँडस्लॅम जेतेपदाचा मानकरी नदाल जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आहे तर फेरर मानांकनामध्ये १३ व्या स्थानी आहे. फेलिसियानो लोपेज एकेरीमध्ये २६ व्या तर दुहेरीमध्ये १३ व्या स्थानी आहे. मार्क लोपेज दुहेरीच्या मानांकनामध्ये १९ व्या स्थानी आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार करता भारतीय संघात समावेश असलेला साकेत मिनेनी एकेरीच्या मानांकनामध्ये १३७ व्या स्थानी आहे तर रामकुमार रामनाथनचे रँकिंग २०३ आहे. दुहेरीमध्ये लिएंडर पेस ६३ व्या स्थानी आहे. रोहन बोपन्नाने दुखापतीमुळे या लढतीतून माघार घेतली असून भारतासाठी हा मोठा धक्का आहे. त्याच्या स्थानी युवा टेनिसपटू सुमित नागल भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याचे एकेरीतील मानांकन ३८० तर दुहेरीतील मानांकन ६९३ आहे.