भारत चौथ्या स्थानी कायम
By admin | Published: July 6, 2015 11:34 PM2015-07-06T23:34:23+5:302015-07-07T01:31:03+5:30
भारताने आयसीसी कसोटी मानांकनामध्ये चौथे स्थान कायम राखले आहे.
कसोटी मानांकन : इंग्लंडला आगेकूच करण्याची संधी
दुबई : भारताने आयसीसी कसोटी मानांकनामध्ये चौथे स्थान कायम राखले आहे; पण आशियाई संघाच्या तुलनेत एका गुणाने पिछाडीवर असलेल्या इंग्लंड संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी ॲशेस मालिकेदरम्यान आगेकूच करण्याची संधी आहे.
बुधवारपासून कार्डीफमध्ये ॲशेज मालिकेला प्रारंभ होत आहे. या प्रतिष्ठेच्या मालिकेत उभय संघ विजयासह मानांकनामध्ये सुधारणा करण्यास प्रयत्नशील आहेत. इंग्लंड ९७ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. दशांश गुणफरकाने इंग्लंड संघ पाकिस्तानच्या तुलनेत पुढे आहे. ऑस्ट्रेलिया संघ १११ मानांकन गुणांसह दुसर्या स्थानी आहे.
इंग्लंडने या मालिकेत ३-०ने विजय मिळविला, तर त्यांना दुसर्या स्थानावर पोहोचण्याची संधी असेल; पण ऑस्ट्रेलियाने पाचही सामन्यांत विजय मिळविला, तर यजमान संघाची सातव्या स्थानी घसरण होईल. ऑस्ट्रेलियाने ५-०ने विजय मिळविला, तर त्यांचे ११८ मानांकन गुण होतील आणि अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेपेक्षा ते १२ गुणांनी पिछाडीवर असतील. इंग्लंडने पाचही सामन्यांत विजय मिळविला, तर ऑस्ट्रेलियाची चौथ्या स्थानावर घसरण होईल. इंग्लंडने ३-० किंवा ४-१ ने विजय मिळविला, तर ऑस्ट्रेलिया संघाची आपल्या परंपरागत प्रतिस्पर्धी संघाच्या तुलनेत तिसर्या स्थानावर घसरण होईल.
फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव्हन स्मिथ आपले अव्वल स्थान कायम राखण्याच्या निर्धाराने या मालिकेत सहभागी होईल. स्मिथने सध्या दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सपेक्षा पाच गुणांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, विराट कोहली (१०व्या स्थानी) कसोटी फलंदाजांच्या मानांकनामध्ये अव्वल १० मध्ये समावेश असलेला एकमेव भारतीय आहे. गोलंदाजी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन अव्वल स्थानी असून, भारताच्या एकाही गोलंदाजाचा अव्वल १०मध्ये समावेश नाही. (वृत्तसंस्था)
०००